जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी केलेल्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना केंद्र शासनामार्फत टप्याटप्याने लाभ देण्यात आला आहे. या योजनेच्या लाभासाठी आयकर भरणाऱ्या व्यक्ती अपात्र आहे. अशा अपात्र व्यक्तींकडून त्यांना मिळालेली लाभाची रक्कम परत वसुल करण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाले आहेत. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) फेब्रुवारी 2019 पासुन राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना केंद्र शासनामार्फत टप्याटप्याने लाभ देण्यात येत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत आयकर भरणारे व्यक्ती अपात्र असल्याने अशा आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या शासनकडुन प्राप्त झाल्या आहे. या लाभार्थ्यांना अपात्र करुन त्यांचेकडुन त्यांना मिळालेली लाभाची रक्कम परत वसुल करणेबाबतचे निर्देश प्राप्त आहेत. त्याअनुषंगाने प्राप्त यादीनुसार सर्व संबंधित लाभार्थ्यांना त्यांना मिळालेल्या लाभाची रक्कम परत शासन जमा करणेकामी वसुलीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अशा आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांपैकी बाहेरगांवी राहणाऱ्या/बँकेत रक्कम जमा करतांना अडचणी असल्यास अशा लाभार्थ्यांना लाभाची रक्कम पुढीलप्रमाणे शासनास परत करता येईल.
आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांपैकी जे लाभार्थी बाहेरगांवी राहणारे आहेत, असे लाभार्थी हे परत करावयाच्या लाभाच्या रकमेचा Account Payee चेक/धनाकर्ष (Demand Draft) नोटीसच्या प्रतीसह संबंधित तहसिल कार्यालयाच्या पत्यावर रजिष्टर पोष्टाने पाठवु शकतात. सदरचे चेक/ धनाकर्ष पाठवितांना लाभार्थी यांची चेक/धनाकर्षच्या मागील बाजुस लाभार्थ्यांचे पुणे नांव व पीएम किसान लाभार्थी अनुक्रमांक नमुद करणे आवश्यक राहील. याप्रमाणे चेक/धनाकर्ष प्राप्त झाल्यावर त्याबाबतची पोच संबंधितास पोष्टाने पाठविण्यात येईल.
जळगाव जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना लाभाची रक्कम रोखीने परत जमा करण्यात बँकेत अडचणी येत असतील/ज्या लाभार्थ्यांकडे चेक उपलब्ध नसतील. असे लाभार्थी त्यांचे खाते असलेल्या बँकेच्या शाखेतुन परत करावयाच्या लाभाच्या रक्कमेचा बँकर्स चेक/ धनाकर्ष काढुन तहसिल कार्यालयात जमा करता येईल. असे अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.