अकोला (प्रतिनिधी) मध्यप्रदेश व महाराष्ट्रात सोनसाखळी पळविणाऱ्या चोरटयांच्या आंतरराज्यीय टोळीतील चौघांना अकोला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. या टोळीतील सदस्यांना मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून अटक केल्याची माहीती पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शनिवारी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
अकोला शहरात दोन चोऱ्या !
३ जानेवारी रोजी चोरट्यांनी सरकारी रुग्णालयाजवळून दुचाकी चोरली आणि त्याच दुचाकीने खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड मधील एका दुकाना जवळून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढत काही अंतरावर ती दुचाकी सोडून पसार झाले होते. दुसरी घटना १२ जानेवारी रोजी त्यांनी शहरातून दुचाकी चोरली आणि त्या दुचाकीवरून तोष्णीवाल लेआऊट येथून पायी जाणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी चोरली होती व काही अंतरावर तीच दुचाकी सोडून ते पळून गेले होते.
गुन्ह्याची दिली कबुली !
या दोन्ही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी एपीआय कैलास भगत, पीएसआय गोपाल जाधव व त्यांचे पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक गठीत करून चोरट्याचा शोध सुरु केला होता. त्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथून कुप्रसिद्ध चेन स्नॅचरचा सहभाग असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून आरोपी संजय ब्रजमोहन चौकसे रा. तिल्लोर खुर्द मध्यप्रदेश याला ताब्यात घेतले. तसेच आरोपी अभिषेक अनंतीलाल साहू (रा. विलास नगर अमरावती), शंकर उर्फ क्सीम फुलचंद भदेरिया (रा. ब-हाणपूर हमु. किनखेड चोहट्टा बाजार), चौथा आरोपी दीपक शंकरराव पानझाडे (रा. डाबकी रोड अकोला) यांना ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी शहरातील सिव्हिल लाइन, खदान, सिटी कोतवाली, रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच गुन्हे केल्याची कबुली दिली.
कारागृहातून सुटल्यावर १५ दिवसांत चार चोऱ्या !
कारागृहातून सुटल्यानंतर आरोपींनी १५ दिवसांमध्ये विविध ठिकाणी चार चोऱ्या केल्या. चेन स्नॅचर संजय ब्रजमोहन चौकसे याचेवर अकोला, अमरावती, मलकापूर, मुक्ताईनगर, भुसावळ येथे याच महिन्यात वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
जिथे दुचाकी चोरी तिथेच चेन स्नॅचिंग !
या टोळीतील सदस्य ज्या शहरात चेन स्नेचींग करायचे त्याच ठिकाणी आधी दुचाकी चोरत असल्याची माहीती समोर आली आहे. गंभीर गुन्हयात त्याच दुचाकीचा वापर करून नंतर ति दुचाकी सोडुन पळून जाण्याची पध्दत होती. गुन्हा करताना पुरावा मागे न सोडण्यासाठीही ते शक्कल लढवत होते. मात्र स्थानीक गुन्हे शाखेने १५ दिवसांत तांत्रीक तपास करीत या टोळीचा पर्दाफाश केल्याची माहीती पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.