जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच येत्या ३१ जानेवारी रोजी पल्स पोलीओ लसीकरण मोहिमही जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी, उपाययोजना व जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी, करावयाचे सहकार्य याबाबत माहिती देणारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन शनिवार, दि. ३० जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ठिक ७:४० वाजता प्रसारित होणार आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांनी आपल्या मुलाखतीत कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून नागरीकांनी घाबरण्याचे कारण नाही. त्याचबरोबर कोरोनाची लस आलेली असली तरी, नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना घ्यावयाची काळजी, कोरोना काळात स्वयंशिस्तीला असलेले महत्व, पल्स पोलीस लसीकरण मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटीतील ३ लाख ७२ हजार बालकांना २६५४ बुथवर करण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाने केलेली तयारी आदिंबाबतची माहिती आपल्या मुलाखतीत दिली आहे. ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे. तरी जिल्हावासियांनी ही मुलाखत शनिवार, ३० जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ठिक ७.४० मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणी केंद्रावर ऐकावी. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.