मुंबई (वृत्तसंस्था) मुंब्रातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने या प्रकरणाचा तपास एनआयए कडे देण्याची मागणी केली आहे. दरम्यान यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. ही घटना दुर्देवी आहे. पण एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही असे संजय राऊत म्हणाले.
हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची विरोधक मागणी करत आहेत. एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही, असं सांगतानाच मुंबई पोलीस हा तपास करण्यात सक्षम आहे. आता तर गृहमंत्र्यांनी एटीएसकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. हिरेन यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. ही शंका दूर झाली पाहिजे. पण त्यांच्या मृत्यूचं कुणीही भांडवल करू नये, असा टोला राऊत यांनी लगावला. हिरेन यांचा मृत्यू का झाला? कोणत्या कारणाने झाला? त्याला कोण जबाबदार आहेत? या सर्व प्रश्नांशी संबंधित सत्य लवकरात लवकर बाहेर यायला हवं. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी लगेचच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं योग्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हंटल.
यावेळी राऊत यांना सचिन वाझेंवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी बोलण्यास नकार दिला. वाझेंचं मला माहीत नाही. मला असं वाटतं एखाद्या अधिकाऱ्यावर बोलणं योग्य वाटत नाही, असं सांगत राऊत यांनी या विषयाला बगल दिली.















