चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील दुग्ध व्यवसायिक राहुल कोठावदे याच्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन पाच जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरातील अवैधरित्या – सावकारी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील नम्रता डेअरीचे संचालक राहुल अशोक कोठावदे (वय २८) याने ३० नोव्हेंबरला आपल्या नेताजी चौकातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मयत – राहुलचे वडील अशोक रामदास – कोठावदे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली, की त्यांच्या मुलाच्या मृत्यूला त्याला जादा व्याजदराने पैसे देऊन धमकी देणारे सावकार जबाबदार आहेत.
शहरातील खासगी सावकारी करणारे अविनाश पाटील, (रा. मुक्तानंद नगर), सचिन उर्फ मनोज चव्हाण (रा. पाटीलवाडा), संजय पाटील (रा. एम. जे. नगर), कैलास पाटील (रा. रांजणगाव) व अमोल चौधरी (रा. हुडको कॉलनी) या सर्वांनी राहुल याला व्यवसायासाठी भरमसाठ व्याजदराने पैसे दिले. त्यांनी व्याजासह मुद्दल रक्कम वसूल करुन पुन्हा पैशांची मागणी केली. त्याच्यासह कुटुंबातील लोकांना शिवीगाळ व दमदाटी केली. या त्रासाला कंटाळून राहुलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित सचिन उर्फ मनोज चव्हाण याला अटक केली. इतर चौघे मात्र पोलिसांना मिळून आले नसल्याचे उप निरीक्षक योगेश माळी यांनी सांगितले.