जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सध्या स्थितीत सर्वात शक्तिशाली पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. दोन खासदार, चार आमदारांसह एक कॅबिनेट मंत्री असलेल्या भाजपा सोबत शिवसेनेचे चार, राष्ट्रवादी आणि अपक्ष प्रत्येकी एक आमदार आहेत. महायुतीचे तीन कॅबिनेट मंत्री असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के यश मिळवण्याबाबत भाजप अगदी निश्चिंत आहे.
राजकीय पटलावर सगळं गणित जुळलेलं असतांना अति आत्मविश्वासात दुदैवाने कुरघोडी करण्याचा प्रयत्न नेतृत्वाने केलाच तर मात्र, जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदार संघातील उमेदवारीची राजकीय गणिते बदलल्यास आश्चर्य वाटू नये. जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोघं लोकसभा मतदार संघातील उमेदवार भाजप बदलणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. अर्थात त्याला कारणं देखील तशीच आहेत. खासदार रक्षाताई खडसे आणि खासदार उन्मेष पाटील हे दोघंही मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकीय गोतावळ्याच्या वर्तुळा बाहेर फेकली गेली आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुड बुक’मध्ये त्यांचा असण्याचा आता अर्थातच विषयच येत नाही. त्यामुळेच आपण जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांचा जळगाव जिल्ह्यात भाजप लोकसभेची दोघं उमेदवार बदलणार का ? याबाबतचा अंदाज काय ?, हे आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघ !
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची स्थानिक राजकीय स्थिती अडचणीची आहे. स्थानिक पक्षाचे स्थानिक आमदार आणि संकटमोचकांशीही त्यांचे फारसे सख्य राहिलेले नाही. आमदारांना खासदारपदी बढती संकटमोचकांनाही रुचणारी नाही. तिकीट कापण्या इतके मोठे कारण सध्यातरी दिसत नसल्याने उन्मेष पाटील यांना पुढील उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसते.
रावेर लोकसभा मतदार संघ !
यावेळी भाजपासाठी करो या मरोची स्थिती आहे. काहीही करून दिल्ली पुन्हा काबीज करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. रावेरच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना टाळायचे तर ते केवळ खडसे नावामुळे. रक्षा खडसे भाजपाच्या उमेदवार नसतील, यावेळी खुद्द संकटमोचकांना दिल्लीच्या रिंगणात कर्तृत्व सिद्ध करावे लागण्याची शक्यता आहे. अर्थात राजकारणात अंदाज, ठोकताळ्यांना फारसा वाव नसतो. समोरून काय चाल येते त्यावर बऱ्याचश्या बाबी अवलंबून असतात.
-हेमंत अलोने
(संपादक दै. देशदूत तथा राजकीय विश्लेषक, जळगाव, मो. 98227 53215)
जळगाव लोकसभा मतदार संघ !
जळगाव लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन या दोघांच्याही ‘बॅड बुक’मध्ये आहेत. त्यामुळे उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळेल, असं वाटत नाही. अगदी कधी काळीचे त्यांचे जिवलग मित्र विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी देखील त्यांचे मुळीच जमत नाही, हे आता ओपन सिक्रेट आहे. खडसे यांना थेट अंगावर घेतल्यामुळे मंगेश चव्हाण हे फडणवीस आणि महाजन यांच्या ‘गुड बुक’मध्ये आहेत. एकंदरीत पक्षांतर्गत कुरघोडी लक्षात घेता, उन्मेष पाटील यांची पुन्हा दिल्लीवारी आज तरी अवघड दिसतेय !
रावेर लोकसभा मतदार संघ !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन या दोघांना खडसे परिवारातील कोणताही सदस्य राजकीय पटलावर बघायचा नाहीय. त्यामुळे रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल अशी कोणतीही स्थिती आजच्या राजकीय पटलावर दिसत नाहीय. रावेर लोकसभा मतदार संघाचे गणित फक्त एकनाथ खडसे यांच्यासमोर उमेदवार कोण?, याच्यावर अवलंबून असणार आहे. भाजप पक्षश्रेष्ठी खडसेंसमोर खुद्द गिरीश महाजन यांना मैदानात उतरवते की, अमोल जावळे, नंदू महाजन यांना संधी देते हेच बघायचं बाकी आहे. अगदी मोठीच काही खेळी झाली तर अन्य तिसरा कोणता तरी उमेदवार देखील दिला जाऊ शकतो.
-दिलीप तिवारी
(ज्येष्ठ पत्रकार, तथा राजकीय विश्लेषक, जळगाव, मो. 95525 85088)
जळगाव लोकसभा मतदार संघ !
जळगाव लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कायम राहू शकते. कारण उमेदवारी बाबत भाजपने जे काही निकष ठरविले आहे किंवा असतील, त्यात कुठे ही पाटील उणे वाटत नाही. खासदार पाटील यांची लोकसभेतील उपस्थिती आणि कामगिरी ही त्यांची जमेची बाजू तर आहेच, शिवाय पीक विमा, शेतकऱ्यांचे प्रश्न,सिंचनाचा विषय त्यांनी पोटतिडकीने सातत्याने मांडले. पक्षांतर्गत त्यांचे संबंध ही चांगले आहेत.
रावेर लोकसभा मतदार संघ !
रावेर लोकसभा मतदासंघात श्रीमती रक्षाताई खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवांरी देणे पक्षाच्या बदललेल्या भूमिकेशी सुसंगत वाटत नाही. त्या पक्षाशी एकनिष्ठ असल्या तरी त्याची कौटुंबीक राजकीय स्थिती पहाता त्यांना पुन्हा संधी मिळू शकेल, याबाबत साशंकता आहे.
सुरेश उज्जैनवाल !
(ज्येष्ठ पत्रकार, तथा राजकीय विश्लेषक, जळगाव, मो. 88888 89014)
रावेर मतदार संघ
भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी तयारीला लागल्या आहेत. मितभाषी असलेल्या रक्षा खडसे यांनी मतदार संघात आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. मतदार संघाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या लोहमार्ग आणि महामार्गाच्या समस्या सोडविण्यात त्यांना यश आले आहे. खासदार निधीचा विनियोग सर्वसमावेशक पध्दतीने करून रक्षा खडसे यांनी सर्वांगिण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सासरे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोबत संसार थाटला असला तरी रक्षा खडसे यांच्या हातून मात्र पक्ष विरोधी एकही कृत्य झालेले नाही. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे यांना टार्गेट केले जात असतांना सुध्दा रक्षा खडसे यांनी आपला संयम ढळू दिलेला नाही, शिवाय मतदार संघात असलेले लेवा आणि गुजर समाजाचे प्राबल्य यासर्व त्यांच्या जमेच्या बाजू असल्याने त्यांना उमेदवारी दिल्यास भाजपाचा विजय रथ रोखणे कुणालाच शक्य नाही.
राजकारणात प्रत्येकाचा हिशोब चुकता करण्याची संधी म्हणून निवडणूकीकडे पाहिले जाते. खडसे आणि महाजन यांच्यातील विळाभोपळ्याचे नाते राज्यात सर्वश्रृत आहे. अशात खडसेंचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी ठरवून रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवर गंडांतर येवू शकते. असे झाले तर मात्र, भाजपला येथे विजयासाठी संघर्ष करावा लागू शकतो. अशात नवीन उमेदवार कोण? याचा शोध घेण्यापासून पक्षाला सुरूवात करावी लागेल. गिरीश महाजन स्वतः येथून लढू शकतात अशी हवा सध्या निर्माण केली जात आहे. मात्र, राज्यात महत्वाची भुमिका वाट्याला आली असतांना लोकसभेची उमेदवारी घेऊन महाजन हिट व्हिकेट देतील असं तुर्तास तरी शक्य वाट नाही. पण केंद्र नेतृत्वाने फडणवीस यांचे नेतृत्व कमकुवत करण्यासाठी म्हणून महाजन यांना निवडणूकीचा बोहल्यावर चढविलेच तर मात्र, रावेर मतदारसंघाची लढत राज्यातील हाय प्रोफाईल लढत ठरेल. महाजन यांना स्वतः लढण्यापेक्षा रक्षा खडसे यांची उमेदवारी हिसकावून घेण्यात जास्त इंटरेस्ट दिसतोय. महाजन आपल्या उद्देशात यशस्वी झाले तर त्यांची पहिली पसंती स्व.खा.हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांनाच राहिलं. ऐनवेळी हरिभाऊंची रद्द करण्यात आलेल्या उमेदवारीचा हिशोब यानिमित्ताने महाजन चुकता करू शकतील सुध्दा. मात्र, जावळेंच्या विजयासाठी त्यांना जंगजंग पछाडावे लागले असं मतदार संघातील सध्या तरी चित्र आहे. खडसेंना रिप्लेस करून शंभर टक्के यशाची हमी केंद्रीय नेतृत्वाने मागितली तर मात्र महाजन यांची गोची होवू शकतो. अशातच विजयाच्या हमीसह जिल्ह्यातील काॅंग्रेसचे अस्तित्व संपवायचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतलाच तर काॅंग्रेसचे माजी खासदार डाॅ.उल्हास पाटील यांच्या कन्या डाॅ. केतकी पाटील यांचा पर्याय समोर येवू शकतो. अल्पावधीची खासदारकी मिळालेल्या डाॅ.उल्हास पाटील यांना नेहमीच यशाने हुलकावणी दिली आहे. काॅंग्रेसची दिवसेंदिवस होत चाललेली अधोगती पहाता भाजपा सारख्या बलाढ्य आणि विजयाची खात्री असणारा प्लॅटफॉर्म मिळत असेल तर विजयाच्या रथावर स्वार होण्यासाठी ते कन्या डाॅ.केतकी पाटील यांना ‘जय श्रीराम’ म्हणून आशीर्वाद देवू शकतात, असे झाले तर खडसेंचा सफाया आणि भाजपाच्या विजयाचा मार्ग अधिक प्रशस्त होवू शकतो.
जळगाव मतदार संघ
भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या या मतदारसंघात पक्षाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे सुद्धा विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी प्रचंड उत्सुक दिसत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारण आणि जिल्हा नेतृत्वा सोबत असलेला समन्वयाचा अभाव यामुळे अनेक जमेच्या बाजू असल्या तरी त्यांच्या उमेदवारी संदर्भात मतदारसंघात साशंकतेचे वातावरण आहे. अतिशय संयमी आणि विनम्र स्वभावाचे धनी असलेल्या खा.उन्मेष पाटील यांच्या विषयी मतदारसंघात नकारात्मक वातावरण नाही ही त्यांची जमेची बाजू आहे. भाजपाच्या चौकटीत राहून कार्य करणाऱ्या उन्मेष पाटील यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात खासदार निधीच्या माध्यमातून विकास कामे केली आहेत. सुरूवातीच्या काळात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचा अपवाद वगळता त्यांचे मतदारसंघातील सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या सोबत जिव्हाळ्याचे संबंध आहे. मतदारसंघातील वर्षानुवर्षे रेल्वे प्रवाशांचे प्रश्न मार्गी लावण्यात पाटील यांना यश आले आहे. भुसावळ ते बांद्रा खान्देश एक्स्प्रेस आणि भुसावळ ते मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस सुरू करून उन्मेष पाटील यांनी मतदारसंघच नव्हे तर खान्देशवासीयांची मने जिंकली आहेत. धुळे मुंबई एक्सप्रेस ही सुद्धा पाटील यांचीच मोठी उपलब्धी मानली जाते. मतदारसंघातील प्रत्येक गावात खासदार पाटील यांनी निर्माण केलेला जनसंपर्क त्यांचा विजयाचा मार्ग अधिक प्रशस्त करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बळ उन्मेष पाटील यांच्या मताधिक्यात विक्रमी वाढ करू शकते.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत नेत्याच्या अंगी उपद्रव मुल्य असणे आवश्यक आहे. अपद्रव मुल्य नसलेला नेता अडगळीत पडतो या विदारक सत्यापासून अनभिज्ञ असणं उन्मेष पाटील यांच्या राजकीय अस्तित्वावरच उठले असल्याचे चित्र आहे. होमपिच असलेल्या चाळीसगाव तालुक्यातच उन्मेष पाटील यांचा होणारा उपमर्द संपूर्ण मतदार संघात चर्चेचा विषय आहे. एकनाथ खडसे यांना टोकाचा विरोध करीत आपलं उपद्रव मुल्य सिध्द करत आ.मंगेश चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांना पछाडले आहे. जिल्हा नेतृत्वाशी मंगेश चव्हाण यांची असलेली सलगी उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. असे झालेच तर भाजपला येथे सक्षम पर्याय शोधावा लागेल आज तरी तो दृष्टिपथात नाही. परिणामी, आमदारांच्या संख्याबळावर शिवसेनेने या जागेवर दावा केला तर आश्चर्य वाटायला नको. जळगाव लोकसभा मतदार संघात भगवा डौलाने फडकावा हे प्रत्येक शिवसैनिकाचे स्वप्न यानिमित्ताने साकार होईल. महायुतीत जागा वाटपाचा मुद्दा कळीचा आहे. परिणामी, उन्मेष पाटील यांचा आपोआप पत्ता कट होवू शकतो, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
भरत चौधरी (संपादक, दै. जनशक्ती तथा राजकीय विश्लेषक, जळगाव मो.74989 49201)
रावेर लोकसभा मतदार संघ !
जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपाचे आहेत. रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे तर जळगावचे खासदार उमेश पाटील हे आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षाचा अवलोकन केले असता वेगवेगळ्या कारणांनी दोन्हीही खासदारांची उमेदवारी धोक्यात आहे.रावेरच्या खासदार रक्षाताई या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई आहेत पूर्वी नाथाभाऊ भाजपाचे मोठे नेते होते. मात्र आता यामुळे रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळणे कठीण आहे, असे मानले जात आहे.त्यांचेऐवजी भाजपा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.तसेच माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे, माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर यांचेही नावे चर्चेत आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपा दोन (जामनेर,भुसावळ) शिवसेना दोन (मुक्ताईनगर,चोपडा) व काँग्रेसचे दोन (रावेर, मलकापूर) आमदार असे समसमान बलाबल आहे. लेवा पाटील बहुल असलेला हा मतदारसंघात उमेदवार बदलविणे भाजपाला सोपे जाईल का?, हे निवडणुकीनंतरच दिसेल. मात्र या दृष्टीने देखील विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे समजते.
जळगाव लोकसभा मतदार संघ !
जळगावचे खासदार उमेश पाटील चाळीसगाव येथील आहेत. जळगाव या जिल्ह्याच्या ठिकाणी खासदारांचे मोठे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जळगाव शहरासह इतरही मतदारसंघातून त्यांच्या विषयी नाराजी आहे. त्याचबरोबर भाजपाच्या स्थानिक आमदार, जिल्हा नेतृत्वाशी त्यांचे संबंध चांगले नसल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे त्यांची देखील उमेदवारी भाजपा बदलवु शकते, असे चित्र आज आहे. मराठा बहुल हा मतदार संघ आहे. शिवसेनेची भूमिका देखील जळगाव लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची ठरत आलेली आहे. शिवसेनेत व राष्ट्रवादीत पडलेली फुट याचा काय परिणाम होतो, यावर देखील या मतदारसंघातील गणित अवलंबून आहे. मोदी यांच्या 400 प्लस मिशनमुळे विद्यमान खासदारांना बदलवतील का?, हा मोठा एक प्रश्न आज आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर पूर्वी सरळ होणाऱ्या लढती आता तिरंगी किंवा चौरंगी होतील, असे शक्यता वर्तवली जात आहे.
मनोज बारी (आवृत्ती संपादक,देशोन्नती तथा राजकीय विश्लेषक, जळगाव, मो.98225 93938) ================================
जळगाव मतदार संघ
भाजपाकडून यंदाची लोकसभा निवडणुक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठीच भाजपा लोकसभेच्या रिंगणात उतरेल. त्यामुळे राजकीय कुरघोडी इतकेच महत्व उमेदवाराच्या मेरीटला असेल. भाजपाची ही रणरिती लक्षात घेतल्यास जळगाव लोकसभेचे विद्यमान उमेदवार खासदार उन्मेष पाटील यांची उमदेवारी बदलण्याची शक्यता तशी कमीच आहे. जिल्ह्याचे नेते मंत्री गिरीश महाजन यांच्याशी उन्मेष पाटील यांचे संबध फार गोड नसले तरी या ठिकाणी नविन उमेदवार शोधून तयार करणे भाजपासाठी कसरत असेल. तसेच समाजाचे गणित व जिल्ह्यातील दोनही उमेदवार बदलवून अंतर्गत गटबाजीला प्रोत्साहन भाजप देणार नाही, असे आज तरी वाटते. त्यामुळे उन्मेष पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
रावेर मतदार संघ
भाजपातून बाहेर पडलेले अर्थात तशी परिस्थिती पक्षानेच निर्माण केलेले एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, अशीच आज परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस व जिल्हा नेते गिरीश महाजन ती काळजी घेतील हे नक्कीच! या मतदारसंघातून रक्षा खडसे यांच्या ऐवजी गिरीश महाजन यांना उभे करुन निवडणुक सुलभ करण्याची रणनिती भाजप आखण्याची शक्यता आहे. रक्षा खडसे यांना पर्याय म्हणून गिरीश महाजन यांच्यासह माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे हा देखील पर्याय भाजपाकडे असल्याने रक्षा खडसे यांचे तिकीट कापणे भाजपासाठी अवघड नाही.
-प्रवीण चौधरी (महाराष्ट्र टाइम्स, प्रिन्सिपल करन्सपॉन्डस तथा राजकीय विश्लेषक, जळगाव, मो.77560 45010)