मुंबई (वृत्तसंस्था) बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हा पराभव मराठी माणसाचा नाही तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा असल्याचं म्हटलंय. आता राऊत यांनीही फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. बेळगाव महाराष्ट्राचा आहे की नाही एवढे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहनच त्यांनी भाजपला दिलंय.
फडणवीस यांना उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव हा महाराष्ट्राचा आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार आहे ते नंतर बघू. बेळगावात मराठी एकजुटीचा विजय झालाच पाहिजे असे बोलणे म्हणजे अहंकार आहे की ती मराठी अस्मिता आहे हे राज्यातील ११ कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या.
खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपकडून दोन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा आणि बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्याबाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा, अशा दोन अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत. या दोन अपेक्षा मांडताना हे मंजूर आहे का, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. अहंकार बाजुला ठेवून हे एवढे कराच, असा टोलाही त्यांनी शेवटी भाजपला लगावला आहे.
फडणवीसांचा राऊतांवर घणाघात
बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय, अशा शब्दात फडणवीस यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी राऊतांना दिलंय.
राऊतांचा संताप
बेळगाव महापालिका निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संताप व्यक्त केला होता. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. महाराष्ट्रातील ६९ लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता.