नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सहसा वृत्तपत्रांमध्ये वधू-वर पाहिजे, या जाहिरातीत प्रामुख्याने त्वचेचा रंग, उंची, चेहऱ्याचा आकार अगदी जात, धर्म याची माहिती दिलेली असते. परंतू हँडसम, श्रीमंत आणि त्याचबरोबर ढेकर न देणारा आणि न पादणारा वर पाहिजे, अशी गंमतीशीर जाहिरात सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या जाहिरातीवर अगदी सेलिब्रिटी देखील चर्चा करताय.
वृत्तपत्रांमधील अशा प्रकारच्या बहुतांश जाहिराती या धर्म, जात यावर आधारित असतात. त्याचबरोबर या जाहिरातींमध्ये प्रामुख्यानं त्वचेचा रंग, उंची, चेहऱ्याचा आकार असे शारीरिक गुणधर्म यांची माहिती असते. तर अनेक जाहिरातींमध्ये सहा आकडी पगार, कुटुंबाची संपत्ती, मालमत्ता यांचाही उल्लेख असतो.
गेल्या आठवड्यामध्ये भारतातील सर्वाधिक खप असलेल्या वृत्तपत्रातल्या एक जाहिरात चांगलीच व्हायरल झाली. एका मुलीसाठी ही जाहिरात देण्यात आली होती. जाहिरातीत मुलीचा उल्लेख ठाम स्त्रीवादी, छोटे केस असलेली आणि पियर्सिंग केलेली असा करण्यात आला होता. तर मुलगा कसा हवा यासाठी आणखीच गमतीशीर वर्णन होते. हँडसम, श्रीमंत आणि त्याचबरोबर ढेकर न देणारा आणि फार्टिंग न करणारा असं यात म्हटले होते. यातही तो स्त्रीवादी मताचा असावा ही अट मात्र कायम होती. त्यामुळे ही जाहिरात व्हायरल झाली. या जाहिरातीवर कॉमेडियन आदिती मित्तल प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढासह अनेकांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे:
समोर आलेल्या माहितीनुसार, एका तरुणीची तिचा भाऊ आणि तिची जवळची मैत्रीण यांनी केलेली ही गंमत होती. साक्षीच्या 30 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही तिची केलेली छोटीशी गंमत होती, असं कुटुंबीयांच म्हणणे आहे. साक्षीनं बीबीसी सोबत बोलताना सांगितलं की, तिचे केस छोटे आहेत आणि तिनं पियर्सिंगही केलं आहे. ती सोशल सेक्टरमध्ये काम करते आणि स्वतंत्र विचारांची अशी मुलगी आहे. तसंच ढेकर किंवा फार्टिंग हा त्यांच्या कुटुंबातील जोकचा भाग आहे. ही जाहिरात उत्तर भारतातील जवळपास 10-12 शहरांमध्ये देण्यात आली होती. तिच्यासाठी 13 हजार रुपये खर्च आला. लॉकडाऊन नसतं तर ही रक्कम आम्ही सेलिब्रेशन आणि गिफ्टवर खर्च केली असती, असं सृजन म्हणाला.