जळगाव प्रतिनिधी – ४थ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज (दि.९) ला अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडांगणावर खेळविण्यात आला. त्यात जे. जे. स्पोर्ट्स हा अंतिम विजयी होऊन त्यांनी ४था किरण दहाड चषक उंचावला. स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे ३० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले होते.
स्व. किरण दहाड स्मृती टी-२० स्पर्धेचे चौथ्या वर्षी १६ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामना जैन स्पोर्ट्स अकादमी ब्ल्यू विरुद्ध जे जे स्पोर्ट्स क्लब दरम्यान झाला. या अंतिम सामन्याची नाणेफेक जे जे स्पोर्ट्स क्लब ने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जे जे स्पोर्ट्स क्लब नये आपल्या निर्धारित २० षटकांमध्ये सात गडींच्या मोबदल्यात एकूण १३३ धावा केल्यात. जे जे स्पोर्ट्स तर्फे संदेश सुरवाडे याने ३४ (२६) कैलास पाटील यांनी ३२ (१८) अशा वैयक्तिक धावा करून आपल्या संघाला १३३ धावसंख्या उभारण्यास मदत केली. जैन स्पोर्टसतर्फे राज बेलदार याने चार षटकात २१ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी मिळविले. १३४ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या जैन स्पोर्ट्स अकॅडमी ला आपल्या निर्धारित २० षटकात केवळ १३१ धावा करत्या आल्यात. त्यामुळे त्यांनी हा अंतिम सामना केवळ दोन धावांनी गमावला त्यांच्यातर्फे मोहम्मद नुमान याने ४४ (४०) धावा केला तर पवन पाटील यांनी ३४ (२०) धावा करून आपल्या संघाला स्पर्धेत ठेवले होते. परंतु जे जे स्पोर्ट्स तर्फे मिलिंद सपकाळे याने ४ षटकार २३ धावा देत ३ बळी मिळविले तर कर्णधार रोहित पारधी याने ४ षटकात १९ धावा देत २ महत्त्वपूर्ण बळी मिळवून अटीतटीच्या सामन्यात आपल्या संघाला निसटता विजय मिळवून दिला.
अंतिम सामन्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण समारोहाचे आयोजन केले होते. यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे तर जिल्हा निवड समितीचे प्रमुख अमळनेरचे संजय पवार व निवड समिती सदस्य प्रशांत विरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम अंतिम सामन्यात ज्याने फलंदाजी करताना २३ (३१) धावा व गोलंदाजीत २ बळी मिळवून आपल्या संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला अशा कर्णधार रोहित पारधी याला सामनाविराचा चषक देण्यात आला. वैयक्तिक बक्षीसांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून आर टी स्पोर्ट्सचा रोहित तलरेजा ज्याने तीन डावात एका शतकासह एकूण १६८ धावा केल्या याला ट्रॉफी व रोख ₹ १ हजार बक्षीस देण्यात आले. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जेंट्स स्पोर्ट्स अकॅडमी चा राज बेलदार ज्याने चार सामन्यात सात बळी घेतले. याला ट्रॉफी व ₹ १००० रोख असे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. मालिकावीर हे पारितोषक जे जे स्पोर्टचा कर्णधार रोहित पारधी ज्याने चार डावात ६० धावा केल्या व ९ बळी मिळविले याला ट्रॉफी व ₹ ३ हजार देऊन गौरविण्यात आले. उपविजेता जैन स्पोर्ट्स अकॅडमी च्या ब्ल्यू संघाला चषक व रोख ₹ १५००० असे बक्षीस देण्यात आले. तर जे जे स्पोर्ट्स क्लब यांना विजेते पदाची ट्रॉफी व रोख ₹ २५००० असे बक्षीस देण्यात आले. मोहम्मद फजल यांनी सूत्रसंचालन केले. मुस्ताक अली यांनी आभार मानले.
फोटो कॅप्शन – विजेता जे जे स्पोर्ट्स व उपविजयी जैन स्पोर्ट्स अकादमीचा ब्ल्यू संघासोबत (डावीकडून) प्रशांत विरकर, संजय पवार, युसूफ मकरा, अरविंद देशपांडे यांच्यासह मान्यवर
















