नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘जय भीम’ (jay bhim) या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. आज या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. ‘जय भीम’ हा दाक्षिनात्य सिनेमा आता ऑस्करच्या यूट्यूब (Oscar youtube) चॅनेलवर दिसणार आहे. हा मान मिळणारा ‘जय भीम हा पहिला तामिळ चित्रपट ठरला आहे’. यामुळे सर्व भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत.
ऑस्करने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर ‘जय भीम’ चित्रपटाला स्थान दिलंय. या चॅनलवर ऑस्कर अकॅदमीचे सदस्य असलेल्या प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांच्या मुलाखती आणि चित्रपटांचे सीन दाखवले जातात. यात आता जय भीमचा समावेश झालाय. असा सन्मान मिळवणारा जय भीम पहिला तामिळ चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता सूर्याची आहे. यात सूर्याने आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या वकील चंद्रू यांची भूमिका साकारलीय.
ऑस्करने प्रकाशित केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?
ऑस्करने जय भीम चित्रपटाचा जो व्हिडीओ प्रकाशित केलाय त्यात या चित्रपटातील काही विशेष सीन दाखवण्यात आले आहेत. याशिवाय चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक ग्नानवेल यांची मुलाखतही दाखवण्यात आलीय. या मुलाखतीत ते या चित्रपटाची कथा आणि त्यातील काही निवडक सीनबद्दल माहिती देत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीलाच एका तुरुंगातून काही कैदी बाहेर येतानाचा सीन आहे. यावेळी तुरुंग अधिकारी शिक्षा भोगून बाहेर येत असलेल्या कैद्यांना त्यांची जात विचारताना दिसतात. तसेच जे कैदी कथित खालच्या जातीचे आहेत त्यांना वेगळं उभं करून नंतर स्थानिक पोलिसांकडून पैसे घेत त्यांच्या हवाली करतात. या कैद्यांवर स्थानिक पोलीस त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाचे गुन्हे दाखवून त्यांना पुन्हा अटक करताना दिसते.
चित्रपटातील हा हेलावणारा सीन झाल्यानंतर व्हिडीओत दिग्दर्शक ग्नानवेल या सीनमागील गोष्ट सांगतात. अशाचप्रकारे ऑस्करने प्रकाशित केलेल्या या व्हिडीओत जय भीम चित्रपटातील काही निवडक सीन घेऊन त्यामागील घटनाक्रम मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्यात आलाय.