अयोध्या (वृत्तसंस्था) अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. पाकिस्तानमधील कुख्यात प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’ ने राममंदिराला बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर मंदिर परिसर व अयोध्या नगरीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर पोलीस नजर ठेवून आहेत. याचवेळी सुरक्षा यंत्रणेला दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या उत्तर प्रदेश, राजस्थान व दिल्लीतील भाविकांच्या बसवर ९ जून रोजी हल्ला झाला. त्यानंतर खोऱ्यातील कठुआ व दोडा जिल्ह्यात अतिरेक्यांनी विविध ठिकाणी हल्ले केले. आता अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. हल्ल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर, राममंदिर आणि अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यंत्रणांनी विमानतळ व राममंदिराला भेट देत सुरक्षेचा आढावा घेतला. येथे येणाऱ्यांची तपासणी करणे व संशयितांची झडती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पाकिस्तानातील कुख्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने राममंदिरावर हल्ला करण्याचा ऑडिओ जारी केला आहे. यात, ‘जैश’चे म्होरके मंदिराला ‘निशाणा बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या धमकीमुळे अयोध्या प्रशासनाला दक्ष राहण्याचे ‘निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, अयोध्येतील सुरक्षेच्या दृष्टीने येथे ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ (एनएसजी) हब तयार करण्यात येत आहे. हे देशातील सहावे हब असणार आहे. यापूर्वी चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद येथे एनएसजी हब बनवण्यात आले आहे. राममंदिराजवळ या हबचे तळ असेल. याअंतर्गत ब्लॅक कमांडो जवान इथे तैनात केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष बाब अशी की, ‘जैश-ए-मोहम्मद’ने ५ जुलै २००५ रोजी दारुगोळ्याच्या जीपने मंदिरावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता पुन्हा एकदा असाच धोका समोर आला आहे.