जळगाव प्रतिनिधी : जळगाव बंगाली लायन्स सुपर किंग क्लब यांच्या आयोजनाखाली जळगाव बंगाली क्रिकेट टूर्नामेंट – चॅलेंज ट्रॉफी सीझन ५ चे दोन दिवसीय भव्य आयोजन २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे. शहरातील क्रिकेटप्रेमींना उत्तम आणि रोमहर्षक सामने पाहण्याची संधी मिळणार असून, स्पर्धेसाठी तयारी जोरात सुरू आहे.
स्पर्धा एम.के.२ मैदान, आर्यन पार्क समोर येथे पार पडणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या नॉकआऊट स्पर्धेत विविध राज्यातून येणाऱ्या बंगाली संघांचा समावेश असेल. स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहे.
लाखोंची बक्षीसे, सन्मानचिन्ह आणि बरेच काही..
संपूर्ण सामन्यात टॉस एक तोळा चांदीच्या शिक्क्याने करण्यात येणार आहे. अंतीम सामना जिंकणाऱ्या संघाला तो दिला जाणार आहे. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक बक्षिसांची मेजवानी मिळणार आहे. विजेता संघ १ लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी, उपविजेता संघ ६० हजार रुपये आणि ट्रॉफी, सेमीफायनल लिस्ट रनर-अप संघ प्रत्येकी १० हजार रुपये, मॅन ऑफ सिरीज खेळाडू एलईडी टीव्ही, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर यांना विशेष बक्षिसे देण्यात येतील.
रक्तदान शिबिराने सामाजिक उपक्रम
या वर्षीच्या स्पर्धेत सामाजिक उपक्रमाचा देखील छान समन्वय करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून दिवसभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ‘रक्तदान, श्रेष्ठदान’ या संदेशासह नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयोजकांचे आवाहन
जळगाव बंगाली लायन्स सुपर किंग क्लब यांच्यावतीने बिस्वनाथ मैती, मिथुन भाई, उत्तम वुनिया, बापी धारा, अमीरूल शेख आणि इतर सदस्य यांनी क्रिकेटप्रेमी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व नागरिकांना स्पर्धा आणि रक्तदान शिबिर दोन्हींसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धा यूट्यूब लाईव्हवरही पाहण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. जळगावच्या क्रीडांगणात दोन दिवस क्रिकेटची उत्कंठा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.
















