जळगाव प्रतिनिधी : सफरचंद मागविण्यासाठी राजस्थानातील व्यापाऱ्याला अडव्हॉन्स रक्कम पाठवूनही माल न पाठविता आदील खान जाफर खान (वय ३९, रा. आकाशवाणी केंद्रामागे) या फळ व्यापाऱ्याची १२ लाख ९३ हजार ९०० रुपयांमध्ये फसवणूक केली. या प्रकरणी राशीद खान व त्याचा भाऊ असलम खान (रा. वरू, राजस्थान) या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आकाशवाणी केंद्रामागे आदील खान जाफर खान हे फळांचे होलसेल व्यापारी वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात जळगावातील इम्रान खान शब्बीर खान, फैसल खान फहीम खान व अमोल कैलास जाधव यांनी सफरचंदाची ऑर्डर दिली. त्या वेळी आदील खान यांनी त्यांचा ओळखीचा राजस्थानातील व्यापारी राशीद खान याच्याकडे सफरचंदची होलसेल ऑर्डर दिली होती. त्यासाठी राशीद याने अडव्हॉन्स रक्कम मागितली व त्यासाठी युपीआय स्कॅनर व बँक खात्याशी निगडीत कागदपत्रे पाठविले. दि. १६ सप्टेंबर रोजी सफरचंदाचा माल पाहिजे असलेल्या व्यापाऱ्याच्या युपीआयवरून सुरुवातीला ७० हजार व नंतर ३० हजार रुपये पाठविले. तर दि. १७ सप्टेंबर रोजी ४ लाख ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे पाठविले.
कॉल करुन देत नव्हता प्रतिसाद
सांगितल्याप्रमाणे मालाची ऑर्डर दिल्यानंतर पाठोपाठ पुन्हा वेगवेगळी ऑनलाईन रक्कम पाठविली. एकूण १२ लाख ९३ हजार ९०० रुपये पाठविले गेले तरी माल आला नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि. २१ सप्टेंबर रोजी राशीद खान याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याने प्रतिसाद दिला नाही.
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ऑर्डर दिल्यानंतर सफरचंदाचा मालही आला नाही व पैसेही परत मिळत नसल्याने आदील खान यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राशीद खान, त्याचा भाऊ असलम खान या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहेत.
















