जळगाव (प्रतिनिधी) घरगुती ग्राहकांचे वीज बिल शुन्यावर आणणारी पंतप्रधान सुर्य घर योजना ही केंद्र आणि राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी महावितरणकडे येणाऱ्या लाभार्थी आणि इतर घटकांना त्यांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करुन लोकांचा योजनेत सहभाग वाढविण्यासाठी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री इब्राहिम मुलाणी यांनी नुकतीच एक बैठक घेऊन विद्युत यंत्रणेस तत्पर राहण्याच्या सुचना दिल्या.
बैठकीत महावितरणच्या सर्व उपविभागातील क्वालिटी कंट्रोलचे अभियंते उपस्थित होते. योजनेच्या संदर्भाने महावितरणकडे येणाऱ्या प्रस्तावावर सर्वेक्षण, टेक्निकल फ़िजिब्लीटी तपासणे आणि प्रस्तावांना मान्यता देणे, तसेच त्याबाबतचे अहवाल अग्रेशीत करण्याची जबाबदारी क्वालिटी कंट्रोल व शाखा अभियंत्यांची असते. महावितरणकडे आलेल्या प्रस्तावावर सर्वेक्षण व टेक्निकल फ़िजिब्लीटी तपासून मान्यता देण्याचे काम शीघ्रगतीने करावे. अशा सुचना मुख्य अभियंता श्री मुलाणी यांनी यावेळी दिल्या.
जळगाव परिमंडलात फ़ेब्रुवारी अखेरीसपासून जून २०२४ पर्यंत ४३९० प्रस्ताव प्राप्त असून ४१७० प्रस्तावांना मान्यता देण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त प्रस्तावात धुळे – ९२७, जळगाव – २८०२, तर नंदुरबार जिल्ह्यातील ४४१ प्रस्तावांचा समावेश आहे. उर्वरीत प्रस्तावांवर सर्वेक्षण आणि टेक्निकल फ़िजिब्लीटी तपासणीचे काम सुरु आहे.
पंतप्रधान सुर्य घर योजना वीज ग्राहकांसाठी मोठी फ़ायदेशीर आहे. या योजनेसाठी शासनाचे अनुदान आहे. घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून सुर्य प्रकाशापासून वीजनिर्मिती करण्याच्या या योजनेत एक, दोन आणि तीन किलो वॅटसाठी अनुक्रमे ३०,०००, ६०,००० व ७८००० हजार रुपयांची सबशिडी आहे. या योजनेच्या अमंलबजावणीसाठी बॅंकाकडून सवलतीने कर्ज व्यवस्थाही करण्यात येत आहे.
छतावर सौर पॅनल बसवून वीजनिर्मितीच्या प्रकल्पात एक किलोवॅटला महिन्याला सरासरी १२०, दोन किलोवॅटला २४० युनिट तर तीन किलोवॅटच्या प्रकल्पातून महिन्याला सरासरी ३६० युनिट वीज निर्मिती होते. सर्वसाधारणपणे घराच्या वीजवापरापेक्षा या सौर पॅनल मधून अधिकची वीज उत्पादन होते. घरात वापरून शिल्लक राहिलेली वीज महावितरणला विक्री करता येते. शिवाय विजेचे बिल शुन्यावर येऊ शकते. योजनेत भाग घेण्यासाठी नागरिकांनी pmsuryaghar.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करण्याचे आव्हानही मुख्य अभियंता श्री इब्राहिम मुलाणी यांनी केले आहे.