जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर येथील लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी आलेल्या रुणाच्या रिपोर्टवर जळगावच्या डॉक्टरांची बनावट सही तसेच त्यांनी केलेल्या नोंदणी क्रमांकाचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डॉ. राहुल मयूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर येथील पिसादेवी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या चालक आणि मालकाविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यानंतर हा गुन्हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
शहरातील अनंत हौसिंग सोसायटीमध्ये डॉ. राहुल रवींद्र मयूर (वय ४९) हे वास्तव्यास असून त्यांचा जळगावात निपुण पॅथॉलॉजी लॅबोरेटरी येथे चाचणी अहवाल करण्याचा वैद्यकीय व्यवसाय करतात. दि. १७ नोव्हेंबर रोजी त्यांना एका इन्श्युरन्स क्लेम इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या इम्रान शेख यांनी संपर्क साधला. शेख यांनी डॉ. मयूर यांच्या व्हॉट्सअॅपवर छत्रपती संभाजीनगर येथील पिसादेवी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी या लॅबमधील राहुल सुधाकर खैरे या रुग्णाचे दि. ७ ऑक्टोबर २०२४ चे रिपोर्ट पाठवले. हे रिपोर्ट डॉ. मयूर यांनी तयार करून प्रमाणित केले आहेत का, याची विचारणा केली. यावेळी डॉ. मयूर यांनी या रिपोर्टवर माझे नाव छापले असले तरी हे रिपोर्ट आपण प्रमाणित केले नसून ही सही आपली नाही तसेच नोंदणी क्रमांकचा गैरवापर झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
डॉ. मयूर यांनी आपण छत्रपती संभाजीनगर येथे व्यवसाय करीत नसून पिसादेवी पॅथॉलॉजीशी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा केला. याप्रकरणी डॉ. मयूर यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पिसादेवी पॅथालॉजी लॅबोरेटरीच्या चालक आणि मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. मात्र, ही घटना छत्रपती संभाजीनगरातील असल्याने सिडको पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. ही लॅबोरेटरी चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीत असल्याने चिकलठाणा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला