मुंबई प्रतिनिधी । देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. आता शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे संपर्कात आलेल्या लोकांना देखील स्वतःची कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन केले आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलं आहे. तसंच संपर्कात आलेल्यांना योग्य काळजी घेण्याचं तसंच करोना चाचणी करण्याची विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती”.
राज्यात बुधवारी दिवसभरात २१ हजार २९ करोना रुग्णांची नोंद झाली. तर दुसरीकडे १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. यासोबत राज्यभरात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० वर पोहोचली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्के इतके झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.