जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील पीएफ कार्यालयात पुण्यातील सीबीआय पथकाने कारवाई करत २५ हजारांची लाच घेणाऱ्या वित्ता व लेखाधिकारी याला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्याती मोठी खळबळ उडाली आहे. रमण वामन पवार (वय-५८ रा. बळीराम पेठ, जळगाव) असे या लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रहिवाशी असलेले तक्रारदार सचिन माळी यांच्या वडिलांच्या नावाने कामगार पुरवठा करणारी फर्म आहे. ती दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. या फर्मचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून माळी यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार रमण पवार यांच्यामार्फत लेखापरीक्षणही केले. मात्र, त्यांनी सचिन माळी यांना लेखापरीक्षणाचा अहवाल दिला नाही. याबाबत विचारणा केली असता रमण पवार यांनी त्यात काही त्रुटी असल्याचे सांगितले. मार्च २०२३ च्या पीएफच्या पेमेंटमध्ये चूक आहे. फर्मच्या पीएफ ऑडीट रिपोर्टसाठी सुरुवातील ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. सचिन माळी यांनी पुण्यातील सीबीआयला याबाबत माहिती कळविली. त्यानुसार मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सापळा रचून संशयित आरोपी रमण वामन पवार यांना अटक केली. न्यायालयाने ११ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.