धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघाच्या कुणाला उमेदवारी द्यावी?, या मुद्द्यावरून भाजपात २०१९ च्या निवडणुकीपूर्वी जसा वाद उफाळून आला होता. तसाच काहीसा राजकीय धुराळा २०२४ मध्ये देखील उडाला आहे. यावेळी निमित्त आहे ते माजी सिनेट सदस्य डी.आर. पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेला विरोध. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांच्या लेटरपॅडवरून थेट प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे. तर दुसरीकडे मी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा मनस्थिती होईल तेव्हा यावर सविस्तर बोलेल अशी भूमिका डी.आर. पाटील यांनी घेतली आहे.
जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे दोघं मतदार संघात काही इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरु केली आहे. दरम्यान, ए.टी. नाना पाटील यांचे तिकीट कापले गेल्यानंतर २०१९ मध्ये भाजपात जळगाव लोकसभा मतदार संघात प्रचंड गोंधळ उडाला होता. आधी स्मिताताई वाघ यांचे तिकीट जाहीर करण्यात आले. त्यानंतर काही जिल्ह्यातील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्यांचे देखील तिकीट कापले गेले होते. त्यानंतर चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. यंदा देखील भाजपाच्या वर्तुळात जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. विशेष म्हणजे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या तिकीटाबाबत पक्षाने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नसतानाही सगळा गोंधळ उडत आहे.
भाजपचे पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांच्या लेटरपॅडवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जिल्हाध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेतून डी.आर. पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समजल्याचे म्हटले आहे. तसेच डी.आर. पाटील भाजपचे साधे सदस्यही नाहीत. त्यांनी पक्षविरोध कारवाया केल्या आहेत. धरणगाव लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणूक आणि नुकतीच झालेल्या डॉ. हेडगेवार ग्राम पंचायत निवडणुकीचा संदर्भ देण्यात आला आहे. तसेच डी.आर. पाटील यांना पक्षामुळे कोणकोणती राजकीय पदे उपभोगली, आर्थिक लाभाचे विषय मिळवले, याचाही उल्लेख करण्यात आला आहे. एवढे असूनही पक्षासोबत त्यांनी वेळोवेळी गद्दारी केल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.
दरम्यान, या तक्रारीच्या प्रति देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विभाग संघटन मंत्री रवींद्र अनाजपुरे, खासदार उन्मेशदादा पाटील, जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर पाटील महाराज यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत. तर या निवेदनावर अॅड. संजय महाजन,सुभाष पाटील, शिरीष बयस, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, निर्दोष पवार, पुनिलाल महाजन, कन्हेय्या रायपूरकर, कमलेश तिवारी, चंदन पाटील, दिलीप माळी यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या सर्व मुद्द्यावर डी.आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या या विषयावर बोलण्याची माझी मनस्थिती नाही. जेव्हा वाटेल तेव्हा निश्चित बोलेल. तूर्त एवढेच सांगेल की, मी विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील यांचे तिकीट कापून मला द्यावे, असे मी कधीही म्हटलेले नाहीय. उलट मागील वेळी उमेदवारी बदलाचा विषय सुरु झाल्यावर उन्मेषदादा यांचे नाव सुचवणाऱ्यांमध्ये मी देखील होतो. आता देखील पक्ष जर नवीन चेहऱ्यांना संधी देणार असेल तर मी इच्छुक असल्याचे संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी मला आणखी काही चार-पाच लोकांसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी चर्चा केली आणि मगच पुढील विषय सुरु केला. राहिला विषय पक्षाची गद्दारीचा तर मला पक्षनिष्ठतेचे प्रमाणपत्र नकोय. आयुष्यभर भाजपचे काम केले आहे आणि करत राहणार आहे. माझे जीवाभावाचे मित्र डी.जी. पाटील यांना कॉंग्रेसकडून विधानसभेला उमेदवारी मिळाल्यानंतरही मी किंचितही वाट भटकू दिली नाही. योग्यवेळी सविस्तर भूमिका मांडेल, असेही डी.आर. पाटील म्हणाले !