जळगाव (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला बळकटी देण्यासाठी शासनाकडून ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. अग्निशमन विभागाला कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे आणि काय खरेदी केले जाणार आहे याची शनिवारी महापौर भारतीताई सोनवणे यांनी माहिती घेतली.
जळगाव शहर मनपाच्या अग्निशमन विभागाचे दिवसेंदिवस बळकटीकरण केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी नवीन अग्निशमन बंब जळगावच्या ताफ्यात दाखल झाले होते. नुकतेच ५० लाख रुपये अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी प्राप्त झाले असून शनिवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी यांच्याकडून माहिती घेतली. महापौरांनी सर्व माहिती घेत याबाबतचा प्रस्ताव तात्काळ तयार करून संबंधित विभागाला सूचना करण्यासाठी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले आहे.
अत्याधुनिक साहित्याची होणार खरेदी
मनपाला प्राप्त झालेल्या ५० लाखांच्या निधीतून अरुंद गल्लीत आग विझविण्यासाठी ३६ लाख रुपये किमतीच्या ३ अग्निशमन अत्याधुनिक दुचाकी, आगीत घुसून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविणारे ६ लाख २५ हजारांचे ५ फायर प्रोक्सीमिटी सूट, धूर ओढून घेणारे यंत्र २ लाख रुपये किमतीचे १, मनुष्यबळाची मदत न घेता कार्यरत राहणारे २ लाखाचे १ पोर्टेबल ग्राउंड वॉटर मीटर, आगीवर पाणी मारणारे विविध प्रकारचे १ लाख ७५ हजारांचे ७ नोझल, दरवाजा तोडणारे दीड लाख रुपये किमतीचे १ डोअर ब्रेकर, अंधारात उजेडासाठी आवश्यक असलेले ४९ हजार ५०० रुपयांचे ९ सर्च लाईट खरेदी केले जाणार आहे. अग्निशमन विभागाने महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे याबाबतचा अंदाजित तपशील दिलेला आहे.