जळगाव (प्रतिनिधी) भंगार साहित्य व पाईप चोरी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या गुन्ह्याचा तपास करतांना यातील संशयितांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. यामध्ये गुन्हा घडत असतांना महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे हे त्यांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले असल्याने मंगळवारी दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती.
तत्कालीन नगरपालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गिरणा पंपिंगपासून गिरणा टाकीपर्यंत बिडाचे पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यातून त्यावेळेस शहराला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र कालांतराने ही योजना बंद झाली होती. दरम्यान, महापालिकेने भंगार साहित्य विक्रीसाठी कंत्राटाच्या नावाखाली शहरात टाकलेली ब्रिटीशकालीन बिडाच्या पाईपांसह भंगार साहीत्य चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी महापालिकेचे विरोधी पक्ष नेते सुनिल सुपडू महाजन यांच्यासह सात जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात एक तर तालुका पोलीस ठाण्यात दोन असे एकूण तीन गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपासणी (एसआयटी) पथक तयार केले असून हे पथक या गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहे.
या गुन्ह्याचा तपास करीत असतांना या गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयितांचे कॉल डिटेल्स काढण्यात आले होते. गुन्हा घडतांनाच्या काळात संशयित आणि महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्यात वेळोवेळी कॉलवर संपर्क झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. त्यानुसार त्यांना एसआयटीच्या पथाने चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती.
नोटीस मिळाल्यानंतर माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे हे मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांची चौकशी केल्यानंतर एसआयटीचे पथकाकडून त्यांचा जाबजबाब नोंदविण्यात आला होता. सायंकाळी उशिरापर्यंत जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरु असल्याने राजकीय गोटात खळबळ माजून गेली होती.
पाईप चोरीच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याने यामध्ये महापालिकेतील अधिकाऱ्यांचा देखील चौकशी केली जात आहे. हे कंत्राटाची प्रक्रिया सुरु असतांना त्या समितीमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेतील कनिष्ठ अभियंता शामकांत मुरलीधर भांडारकर यांची दोन दिवसांपुर्वी चौकशी करुन त्यांचे जबाब एसटीआयटीच्या पथकाकडून नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात महापालिकेतील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.