जळगाव (प्रतिनिधी) मित्रांकडून घेतले पैसे देण्यासाठी दीपक धाडू चिंचोरे (वय ५१, रा. म्हसावद, ता. जळगाव) यांनी बँकेतून २ लाख ५० हजार रुपये काढले. दुचाकीच्या डिक्कीत ते पैसे ठेवून ते घरी जात असतसांना एका दुकानावर थांबले. हीच संधी साधत अवघ्या काही मिनिटातच चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून २ लाख ५० हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना दि. २३ जून रोजी दुपारच्या सुमारास ईच्छादेवी चौकात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे दीपक चिंचोरे हे वास्ताव्यास असून ते खासगी नोकरी करतात. त्यांनी मित्रांकडून पैसे घेतलेले असलने त्यांच्या मित्रांचे पैसे द्यायचे असल्याने दि. २३ जून रोजी ते पैसे काढण्यासाठी जळगावातील ओंकारेश्वर मंदिर परिसरातील एका सहकारी बँकेत आले होते. बँकेतून त्यांनी २ लाख ५० हजारांची रोकड काढली, आणि ते पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवून आकाशवाणी चौकमार्गे इच्छादेवी चौकात पोहचले. त्यांना हार्डवेअर दुकानावर काम असल्याने पाच मिनिटांसाठी त्या दुकानावर थांबले होते.
दुकानावरील काम आटोपून चिंचोरे हे दुचाकीजवळ आले असता, त्यांना दुचाकीची डिक्की उघडी दिसली. त्यांनी लागलीच डिक्कीत ठेवलेली रोकड तपासली असता, त्यांना २ लाख ५० हजारांची रोकड दिसून आली नाही. चिंचोरे यांनी आजूबाजूच्या परिसरात रोकडचा शोध घेतला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. चिंचोरे हे दुकानावर केवळ पाच मिनिटांसाठी गेले होते. त्या पाच मिनिटातच एवढी मोठी रक्कम त्यांना गमवावी लागली. आजूबाजूच्या परिसरात शोध घेवून देखील रोकड मिळून न आल्याने चिंचोरे यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रोहिदास गभाले आहेत.
ईच्छादेवी चौकात थोडा वेळ काम असल्याने त्याठिकाणी थांबलो. दुचाकीच्या डिक्कीत मोठी रक्कम असल्याने दुकानावर गेल्यानंतरही वारंवार डिक्कीकडे पाहतच होतो. मात्र नजर चुकताच चोरट्यांनी संधी साधून रोकड चोरुन नेल्याची आपबिती दीपक चिंचोरे यांनी कथन केली. उघडकीस आल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी ईच्छादेवी चौफुली परिसरातील व बँकेजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये चिंचोरे यांनी बँकेतून रक्कम काढल्यानंतर दोन जण त्यांचा पाठलाग करताना दिसले. मात्र फुटेजमध्ये त्यांचा चेहरा स्पष्ट दिसून आलेला नाही.