जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सामान्य रुग्णालय येथे व्हेंटीलेटर खरेदीत गैरव्यवहार करून संशयितांनी संगणमत करून शासनाची फसवणुक केली व त्यातील पुरावा नष्ट केला म्हणून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होवुन विरुध्द कायदेशीर कारवाई व्हावी, अशा आशयाची फिर्याद तक्रारदार दिनेश भोळे यांनी आज जिल्हा पेठ पोलीस स्थानकात दिली आहे. दरम्यान, तक्रारदार भोळेंनी आपल्या फिर्यादीत अधिकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
‘या’ तिघांविरुद्ध दिलीय भोळेंनी तक्रार
डॉ. नागोराव शिवाजीराव चव्हाण (नोकरी- जिल्हा शल्यचिकित्सक रा. सामान्य रुग्णालय, जळगाव), मिलिंद निवृत्ती काळे (भांडारपाल / स्टोअर किपर रा. सामान्य रुग्णालय, जळगाव, हल्ली नियुक्ती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अहमदनगर जि. अहमदनगर) आणि लक्ष्मी सर्जिकल अॅण्ड फार्मा जळगाव.
माहितीच्या अधिकारात दिली माहिती
जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असलेले व जबाबदार अधिकारी डॉ. नागोजीराव शिवाजीराव चव्हाण हे जिल्हा शल्यचिकित्सक या पदावर आहेत. मिलिंद निवृत्ती काळे हे भांडारपाल या पदावर आहे. दोघांनी दिनांक 29 मे 2021 रोजी लक्ष्मी सर्जीकल ॲण्ड फार्मा जळगाव या पुरवठादारासोबत १५ व्हेंटीलेटर मशिन Max Adult and pediatric ICU Ventilator तसेच १५ व्हेंटीलेटर Max Adult, Pediatric and Neonatal ICU Ventilator, Max Brandà Proton Plus या मॉडेलचे व्हेंटिलेटर प्रती नग रक्कम रूपये 1238471 या प्रमाणे 30 व्हेंटिलेटर एकुण रक्कम रू. 37154130/- (अक्षरी रू. तीन कोटी एकाहत्तर लाख चोपन्न हजार एकशे तीस मात्र) एवढ्या किंमतीत खरेदीचा करारात नमुद आहे.
तसेच व्हेंटीलेटर करारात नमुद केल्यानुसार 30 दिवसांचे आत दिनाक 28 जून 2021 रोजी पर्यंत पोहचविणे बाबतही नमुद आहे. त्यात Financial Aproval बाबत मा. जिल्हाधिकारी यांचा तर Administrative Approval बावत सिव्हील सर्जन यांचा उल्लेख आहे. संबंधितांना रक्कम अदा करण्याची पध्दत ही (Offline) ऑफलाईन नमुद आहे. तसेच Consignee म्हणुन भांडारपाल मिलिंद निवृत्ती काळे यांचा उल्लेख आहे.
दिनांक 29 मे 2021 च्या करारानुसार दि. 28 जून 2021 रोजी सदर व्हेंटिलेटर प्राप्त न होता, दिनांक 29 जून /2021 रोजीच्या डिलेव्हरी चलन वर नमुद Adult Ventilator with compressor Model Shreeyas 900 चे 15 Ventilator मिलिंद निवृत्ती काळे यांनी स्विकारलेचे नमुद आहे. त्याचा डिलीवरी चलन नं.DC/21-22/030 असा आहे. दिनांक 19 जुलै 2021 रोजीच्या डिलीवरी चलन वर नमुद असे Neonatal Ventilartor Model Shreeyash SW21 चे 15 नग Ventilator मिलिंद निवृत्ती काळे यांनी स्विकारल्याचे नमुद आहे. त्याचा डिलीव्हरी चलन नं. DC/21-22/037 असा आहे.
दिनांक 21 जुलै 2021 च्या Invoice No. IV/21-22/032 मध्ये CGST, SGST सह मिळुन 15 Adult Ventilator (Shreeyash-900) नमुद असुन त्याचे एकुण रक्कम रू. 18577065/- (अक्षरी रक्कम रू. एक कोटी पंच्यांशी लाख सत्त्याहत्तर हजार पासष्ट रूपये मात्र) नमुद आहे. दिनांक 21 जुलै 2021 दुसऱ्या Invoice No. IV/21-22/033 मध्ये CGST व SGST सह मिळुन 15 Neonatal Ventilator (Shreeyash. SW21) चे नमुद असुन त्याचे एकुण रक्कम रूपये 18577065/- (अक्षरी रक्कम रू. एक कोटी पंच्यांशी लाख सत्त्याहत्तर हजार पासष्ट रूपये मात्र) नमुद आहे. म्हणजेच दोन्ही Tax Invoice ची किंमत 37154130 (अक्षरी तीन कोटी एकाहत्तर लाख चोपन्न हजार एकशे तीस मात्र) एवढी आहे.
वरीलपैकी सर्व माहिती ही दिनांक 14 जून 2021 रोजीच्या माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जानुसार संबंधितांनी दिलेली आहे. त्यामध्ये Contract व Sanction Order मध्ये नमुद Max Brand व Proton Plus Model ची माहिती नमुद आहे. परंतु पुरवठादाराने Delivery Chalan मध्ये Shreeyash 900 ची 15 व्हेंटीलेटर व Shreeyash SW21 ची 15 Ventilator ही दुसऱ्याच कंपनीची पुरविली व ती दुसऱ्या Brand ची Ventilator Delivery Chalan नुसार मिलिंद निवृत्ती काळे यांनी स्विकारल्याचे त्यांच्या सहीवरून कळते.
व्हेंटीलेटर पडताळणीची विनंती आणि तफावत असल्याचे मान्य !
सदर Brand व Model मध्ये तफावत आढळुन आल्याने संबंधितांना प्रत्यक्ष Ventilator पडताळणीची विनंती केल्यानुसार दिनांक 02/08/2021 रोजी भांडारपाल यांनी मला भ्रमणध्वनीवर कळविल्यानुसार त्या ठिकाणी पडताळणी केली असता GEM Portal वरील Contract व Sanction Order मध्ये नमुद Max Proton Plus या ब्रॅण्ड व मॉडेलची दिसुन आले नाहीत. ती Shreeyash या कंपनीचे आढळून आले. तसेच संबंधितांनी पुरविलेल्या Delivery Chalan मधील Shreeyash या कंपनीचे सिरिअल नंबर व प्रत्यक्ष पडताळणी केलेल्या Shreeyash 900 व Shreeyash SW21 यांच्या सिरिअल नंबरमध्येही तफावत आढळुन आली. या तफावतीबाबत लक्ष्मी सर्जीकल अॅण्ड फार्मा जळगांव यांचे विक्री प्रतिनिधी घनश्याम पाटील जिल्हा सामान्य रूग्णालयातील कनिष्ठ लिपीक जितेंद्र परदेशी व भांडारपाल मिलिंद निवृत्ती काळे यांनी तफावत असल्याबाबत मान्य करत समक्ष लेखी दिलेले आहे.
तक्रार ब्रांड आणि मोडेलची पण चौकशी विनिर्देशची !
याबाबत दिनांक 03 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना लेखी स्वरूपात तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी ज्यांच्यावर माझे आरोप आहेत त्या डॉ. नागोजीराव चव्हाण यांनाच चौकशी समिती नेमुन चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यात समितीने मुळ तक्रार ही Brand व Model ची असुन त्याऐवजी समितीने Specification ची चौकशी केली. त्यामध्येही तफावत आढळुन आल्याचे मान्य करीत व इतर बाबतीतही तफावती असल्याचे मान्य करीत दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे अहवाल सादर केला.
अनियमितता झाली, प्रधान सचिव यांच्याकडे अहवाल सादर
त्या अनुषंगाने सदर खरेदी प्रक्रिया तात्काळ रद्द करणे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी आदेशित केले. सदर प्रकरणी कोणताही निधी संबंधित पुरवठादाराला वितरीत झालेला नाही. परंतु खरेदी प्रक्रिया राबवितांना यंत्रणा स्तरावर अनियमितता झाली असल्याने, संबंधितांवर प्रशासकीय विभागाकडून कारवाई होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी यांच्या दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजीच्या प्रधान सचिव यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात नमुद आहे.
व्हेंटीलेटर परतीचे आदेश देवून पुरावा नष्ट
दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजीच मी स्वतः प्रत्यक्ष मा. जिल्हाधिकारी यांना भेटुन दोष सिध्द आढळून आलेले Ventilator आपल्या समक्ष व पोलीस प्रशासनामार्फत सीलबंद करण्यात यावे. याबाबत निवेदन दिलेले आहे. यात संबंधितांवर कायदेशीर अथवा प्रशासकीय कारवाई होत नाही तोपर्यंत ती चौकशी कामी राखून ठेवण्यात यावी. अन्यथा त्या व्हेंटीलेटरची अनधिकृतपणे संबंधितांमार्फत विल्हेवाट लावुन पुरावा नष्ट केला जावु शकतो. अशी भिती व्यक्त केली होती. तरी संबंधित यंत्रणेने माझ्या निवेदनाची दखल न घेता संबंधित पुरवठाधारकाला व्हेंटीलेटर परतीचे आदेश देवून पुरावा नष्ट केलेला आहे.
कोटेशन वैयक्तिक मागविले असता दीड कोटीहून अधिकची तफावत
सदर Max Proton Plus Brand व Model चे कोटेशन वैयक्तिक मागविले असता सर्व करासहीत त्याची किंमत 577500 एवढी असुन करारपत्रामध्ये त्याच वस्तुची किंमत 1238471 एवढी दाखविण्यात आली. यात दोघांच्या किंमतीत म्हणजेच 1238471 – 577500 + 660971 प्रती नग x 30 नग व्हॅटीलेटर = 19829130 अक्षरी रूपये एक कोटी अठ्ठ्यान्नऊ लाख एकोणतीस हजार एकशे तीस मात्र एवढ्या रक्कमेची तफावत आढळुन आली आहे.
परंतु पुरवठादारासह इतर दोन्ही शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी संगनमत करून करारात नमुद ब्रॅण्ड व मॉडेलची खरेदी न करता फसवणुकीच्या हेतुने इतर Asembled, घरगुती बनावटीचा कमी दर्जा असलेल्या (Shreeyash) कंपनीचे Ventilator चढ्या दराने खरेदी दाखविली व अपहार केला. तसेच रूग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अक्ष्यम्य असा गुन्हा केला आहे.
कटकारस्थानात इतर कोणी सहभागी आहे काय?, चौकशीची मागणी
सदर कंपनीने Tax Invoice मध्ये नमुद CGST व SGST रक्कम रू.1769244 रक्कमेचा भरणा केला आहे किंवा नाही याबाबत तपास होणे गरजेचे आहे. शासन स्तरावरून पुरवठादार लक्ष्मी सर्जीकल यांना रक्कम दिली किंवा नाही याबाबतही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. आरोपी 1 ते 3 यांच्या व्यतिरिक्त अजुनही कोणी या कटकारस्थानात सहभागी आहे काय? या दिशेनेही तपास होणे गरजेचे आहे. तक्रार ही Brand व Model ची होती त्याबाबतही चौकशी होणे गरजेचे आहे. खरेदी प्रस्तावात कुठल्या ठिकाणासाठी खरेदी करण्यात आलेली होती त्याबाबतही तपास होणे गरजेचे आहे.
कुणाच्या आदेशान्वये पुरवठादाराला व्हेंटीलेटर केले परत
संबंधितांनी कुणाच्या आदेशान्वये पुरवठादाराला सदर व्हेंटीलेटर परत करून पुरावा नष्ट केलेला आहे याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. खरेदी प्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे पुरवठादाराला रक्कम दिली नसल्याबाबत म. जिल्हाधिकारी यांच्या अहवालात नमुद आहे. सदर रक्कमेबाबत शंका असल्याकारणाने ती रक्कम संबंधितांना दिली किंवा नाही याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे. तिघां संशयितांनी शासनाची फसवणुक तथा गैरव्यवहार केल्याबाबत सर्व बाजुंनी सखोल चौकशी होवुन संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच या प्रकरणात पुराव्या कामी सोबत जोडलेली सर्व कागदपत्रे, निवेदने, तक्रारी विचारात घेण्यात याव्यात व चौकशी कामी मला सहभागी करून घेण्यात यावे,असेही तक्रारदार भोळे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
याबाबत समितीची चौकशी सुरु आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच यात गुन्ह्याचा प्रकार आहे किंवा नाही?, हे तपासून पुढील निर्णय घेण्यात येईल.
– रामदास वाकोळे
पोलीस निरीक्षक, जिल्हा पेठ
सन २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाच्या ९ सदस्यीय खंडपीठाने ललिताकुमारी प्रकरणात फिर्याद दाखल करून घेण्याबाबत एक निकाल दिला आहे. त्यानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल न झाल्यास मी सुप्रीम कोर्टात दाद मागेल. मी दखलपात्र गुन्ह्याची तक्रार दिलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या चौकशी समितीचा अहवाल देखील फिर्यादीसोबतच जोडलेला आहे.
-दिनेश भोळे
मुख्य तक्रारदार
















