जळगाव(प्रतिनिधी) पोलीस दलाला हादरून सोडणारी एक बातमी जळगाव आतून समोर येत आहे. पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका ग्रामसेवकाला तब्बल १६ लाखात गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे संपूर्ण गुन्ह्याचा कट एका पोलीस कर्मचाऱ्यानेच रचला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यात ग्रेड पीएसआय प्रकाश मेढे, पोलीस कर्मचारी योगेश शेळके आणि दिनेश भोई, असे अटकेतील पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
ग्रामसेवक विकास पाटील यांची सचिन धुमाळ यांच्यासोबत मैत्री होती. धुमाळ याने ग्रामसेवक पाटील यांना माझ्याकडे काही दिवसात पैसे तिप्पट करून देणारा माणूस असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सचिन धुमाळ आणि ग्रामसेवक विकास पाटील हे रेल्वे स्थानकावर दाम तिप्पट करून देणाऱ्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी गेले. त्याचवेळी तीन पोलीस कर्मचारी आले व पैशांच्या बॅगसह निलेश अहिरे नामक व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यामुळे धुमाळ याने ग्रामसेवक विकास पाटील यांना सांगितले की आता पोलीस पैसे घेऊन गेले आहेत. आपल्याला काहीच करता येणार नाही. परंतु ग्रामसेवक विकास पाटील हे पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर पोलीस चौकशीत सगळाच भांडाफोड झाला.
पोलीस कर्मचारी योगेश शेळके यानेच हे सगळे षडयंत्र रचले होते. ग्रेड पीएसआय प्रकाश मेढे आणि दिनेश भोई यांना सोबत घेत त्यानेच पैसे लुबाडण्याचा डाव असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ग्रेड पीएसआय प्रकाश मेढे, पोलीस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि नीलेश अहिरे नामक संशयित आरोपीला अटक केली आहे.
या गुन्ह्यातील मास्टर माईंड हा पोलीस कर्मचारी होता. गुन्हा दाखल करून पाचही संशयतांना अटक करण्यात आली असून सोळा लाख रुपये देखील जप्त करण्यात आले आहे.
-डॉ.महेश्वर रेड्डी
पोलीस अधीक्षक जळगाव