जळगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या राज्यातील सात जणांना बडतर्फ केल्याचे पत्रक सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले आहे. त्यात जळगाव युवक अध्यक्ष रविंद्र पाटील आणि युवक कॉंग्रेसचे जळगाव शहराध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश आहे.
राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांना जे पदाधिकारी समर्थन देतील त्यांना बडतर्फ करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले होते. त्यानुसार युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सात जणांना बडतर्फ केल्याचे पत्रक काढले.
यात सोलापूर युवक अध्यक्ष जुबेर बागवान, जळगाव युवक अध्यक्ष रविंद्र पाटील, बीड युवक अध्यक्ष विजयसिंह बांगर, नाशिक युवक जिल्हाध्यक्ष अविनाश धायगुडे, युवक प्रदेश सरचिटणीस जगदीश पंचबुध्दे, युवक प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. तसेच त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही दोघांना देण्यात आला आहे.