युक्रेन (वृत्तसंस्था) शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी संकटात सापडले आहेत. यात जळगावातील सौरभ पाटील हा विद्यार्थी सुद्धा युक्रेनमध्ये अडकला आहे. सौरभ पाटील हा युक्रेनला गेला आहे. युक्रेनच्या राजधानी असलेल्या किव्ह शहरातील एका होस्टेलमध्ये तो राहतो. तीन दिवसांपासून त्याला प्रशासनाकडून कोणताही प्रत्यक्ष मदत मिळाली नाही. लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी त्याने भारत सरकारकडे आता मदत मागीतली आहे.
मी युक्रेनची राजधानी कीव्ह शहरात अडकलो असून बाहेर अत्यंत भयावह परिस्थिती आहे. सतत बॉम्ब पडण्याचे आवाज येत आहेत. आपल्या इमारतीवर तर पडणार नाही ना ही भीती प्रत्येक क्षणाला मनात आहे. आमचे खाद्यपदार्थदेखील संपत आले असून दोन दिवस पुरेल इतकेच शिल्लक आहे. वसतिगृहात मी एकच भारतीय विद्यार्थी असून मला लवकर येथून सुरक्षित बाहेर काढावे, अशी सरकारला विनंती करत आहे.
मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून राष्ट्रीय क्रीडा व शारीरिक शिक्षण विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. कीव्ह येथे मी कोन्स्टानैस्का लेन ७, डेमिविस्का येथील क्रमांक एकच्या वसतिगृहात अडकलो आहे. बाहेर जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत. २३ तारखेपासून मी वसतिगृहातच आहे. सर्व दुकाने बंद आहेत. रस्त्यावर फक्त सैन्य आहे. दिवसरात्र या ठिकाणी हल्ले सुरू आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी पहाटे साडेचार वाजता मी गाढ झोपेत असताना अचानक जोरात आवाज झाला. त्यामुळे सर्व विद्यार्थी जागे झाले. तो आवाज इतका भयावह होता की त्याची भीती अजूनही मनातून कमी झालेली नाही. तेव्हापासून दिवसा कमी मात्र रात्री जास्त असे हल्ले सुरूच आहे. किचनमध्ये अत्यंत थोडा गॅस शिल्लक राहिला आहे. तो संपल्यानंतर आम्हाला जेवणही बनवता येणार नाही.
कंट्रोल रूममधून विचारणा
पाणीही संपत आले आहे. अन्न, पाणी पुरावे म्हणून बचत करून ते थोडे-थोडे वापरत आहे. मात्र दोन दिवसांपेक्षा जास्त हे पुरणार नाही. मला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र कंट्रोल रूममधून विचारणा झाली असून सध्याची परिस्थिती पाहता लवकरात लवकर मला मदत करावी. माझी आई चिंतेत आहे.