जळगाव प्रतिनिधी : केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जळगाव परिमंडलातील 27 हजारांहून अधिक ग्राहक छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती करत आहेत. त्यांची स्थापित क्षमता 100.44 मेगावॅट असून, शंभरी पार करणारे जळगाव हे नागपूरनंतर राज्यातील केवळ दुसरे परिमंडल ठरले आहे.
घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना मेळाव्यांद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. याबरोबरच महावितरणकडून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे तसेच सौर नेटमीटरदेखील महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज संबंधित ग्राहकांना दिवसा वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून ती संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. 300 युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुमारे 25 वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे.
पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प उभारण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प उभारल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या वेबसाईटवरील अक्षय ऊर्जा पोर्टलवरही अधिक माहिती व अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
महावितरणच्या जळगाव परिमंडलात योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत परिमंडलातील 27 हजार 197 ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. यात जळगाव मंडलातील 16 हजार 638 ग्राहकांनी 61.81अ मेगावॅट, धुळे मंडलातील 7 हजार 212 ग्राहकांनी 26.66 मेगावॅट तर नंदूरबार मंडलातील 3 हजार 329 ग्राहकांनी 11.97 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर बसवून वीज निर्मिती सुरू झालेली आहे.
पीएम-सूर्यघर योजनेत सौर ऊर्जा संच बसवणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून यासंबंधीच्या सर्व प्रकिया ऑनलाईन व सुलभ करण्यात आली आहे.
– इब्राहिम मुलाणी, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडल