जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील बालकांपर्यंत मराठी संस्कृतीची व परंपरांची महती पोहचावी. त्यांनी लोककलांचा अभ्यास करुन ही परंपरा पुढे जोपासावी या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा शहरात दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेतर्फे या महोत्सवाचे ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दि. २८ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्ष अभिनेत्री ॲड. निलम शिर्के सामंत यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
बालकलावंतांच्या सर्वांगिण कलात्मक विकासासाठी तसेच त्यांना महाराष्ट्राची संस्कृती व परंपरांसह लोकपरंपरांचीही माहिती व्हावी म्हणून या महोत्सवात समूह लोकनृत्य व समूह लोकगीत गायनासोबतच एकल लोकनृत्य, लोकगीत गायन व लोकवाद्य वादनाचे स्पर्धात्मक आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या महोत्सवात दि.२८ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता उद्घाटन सोहळा झाल्यानंतर समूह लोकनृत्य स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत २१ संघांचा सहभाग आहे. दि. २९ नोव्हेंबरला दुपारी १ वाजेपासून सुरु होणाऱ्या महोत्सवात सुरुवातीला एकल लोक वाद्यवादन, एकल लोकगीत गायन, एकल लोकनृत्य स्पर्धा होणार असून, यात ६५ बालकलावंतांचा सहभाग आहे. त्यानंतर समूह लोकगीतगायन स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.
यासोबतच समूह लोकनृत्य व समूह लोकगीत गायनाकरिता सर्वोत्कृष्ठ ४ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्कृष्ठ ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तम २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर १ हजार रुपये व प्रमाणपत्र, एकल लोकगीत गायन, लोकवाद्य वादन व लोकनृत्य याकरिता सर्वोत्कृष्ठ २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्कृष्ट १५०० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तम १ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच ५०० रुपये व प्रमाणपत्र असे प्रशंसनीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी जळगावकर रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहून, बालकलावंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले आहे.















