जालना (वृत्तसंस्था) जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी तीव्र लाठीमार केल्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी धुळे-सोलापूर महामार्गावर 3 गाड्या पेटवल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आंदोलक गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत होते. त्यांची शुक्रवारी पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. या घटनेमुळे या भागात मोठा तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे मराठा उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी आक्रमक आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचेही वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.
ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, असा दावा पोलिसांनी केला आहे. तर उपोषणस्थळी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना घेण्यासाठी पोलिस आले असता मंडपातील नागरिक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि दगडफेक, लाठी चार्ज झाला. गावातील आनेक नागरिक जखमी झाले, पोलिस देखील जखमी झाले आहेत. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. पण पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे प्रकरण हाताबाहेर गेल्याचे कळते. लाठीचार्ज घटनेचा निषेध म्हणून मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ केली आहे. घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून उद्या बीड बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. तर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा झाला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी दोनदा हवेत गोळीबार केला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे.
दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !
मी स्वत: उपोषणकर्त्याबरोबर बोललो होतो. मी अधिकाऱ्यांनाही बोललो होतो. पोलीस एस पी आणि कलेक्टरशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. त्यांनी सांगितलं की, जरांगे पाटील यांना रुग्णालयात नेणं जरुरीचं होतं. त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता. पण त्यावेळी दगडफेकीची दुर्देवी घटना घडली. सरकार याची सखोल चौकशी करेल. यातून खरं वास्तव्य समोर येईल. दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
गृह खात्याकडून अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे : शरद पवार !
जालन्यातील उपोषण आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. उपोषण थांबावावे असा पोलिसांचा आग्रह होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर काही कारण नसताना लाठी हल्ला झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले.
राज्य सरकारच्या कृतीचा निषेध : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण !
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवाली, ता.अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हीडीओतून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येतो.
मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे.
मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन प्रकरणातील ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे.
आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज अतिशय संतापजनक : खा. सुप्रिया सुळे !
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.