पहूर (प्रतिनिधी) युट्यबवरील व्हिडिओ पाहून प्रिंटरच्या माध्यमातून चक्क बनावट नोटा तयार करणाऱ्या जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रूक येथील तरुणाचा जामनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उमेश चुडामण राजपूत वय २२ असं अटकेतील संशयितांचं नाव आहे.
जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या हिंगणे बु. (ता. जामनेर) येथील उमेश चुडामण राजपूत (वय २२) या तरुणाने युट्युबवर व्हिडिओ पाहून मोबाईल आणि प्रिंटरच्या सहाय्याने दोनशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा छापून व्यवहारात आणण्याचा उद्योग सुरू केला. गेल्या सात-आठ महिन्यांपासून सुरू झालेल्या या त्याच्या उद्योगाविषयी त्याने कोणासही काही समजू दिले नाही. नोटा छापणे आणि मार्केटमध्ये व्यवहारात आणणे असाच जणू त्याने धडाका लावला होता.
पहूर बसस्थानकावर दोनशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा व्यवहारात आणल्या जात असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पद अवस्थेत फिरत असलेल्या उमेश राजपूत यास विचारपूस केली. मात्र त्याने सुरुवातीला उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ दोनशे रुपयांच्या ३ नोटा आढळून आल्या. ३ पैकी १ नोट बनावट असल्याचे निष्पन्न होताच पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पथकासह हिंगणे बु. गाठून उमेश राजपूत त्याच्या घराची झडती घेतली. उमेश राजपूत याच्या घरात कॅनन कंपनीचे रंगीत प्रिन्टर, २०० रुपयांच्या ४६ बनावट नोटा, कोरे कागद, कटर असे नोटा छापण्यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य पोलीसांनी जप्त करून बनावट नोटांचा पर्दाफाश केला.