जामनेर (प्रतिनिधी) दारू पिल्यानंतर उलट्या केल्यानंतर हॉटेलमधून बाहेर काढल्याचा राग आल्यामुळे हॉटेल मालकासह एकाला लाकडी काठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात राजू पांचाळ व दगडू पांचाळ यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रमोद रामकृष्ण कचरे (वय २७ रा. विवेकानंद नगर, जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १५ जून २०२२ रोजी राजू पांचाळ याने प्रमोद कचरे यांच्या हॉटेलमध्ये दारू पिल्यानंतर उलट्या केल्याने प्रमोद यांनी त्याला हॉटेलच्या बाहेर काढले. राजू पांचाळ याला हॉटेलमधून बाहेर काढल्याचा राग आला. तसेच गैर कायद्याची मंडळी जमवून हातात लाठ्याकाठ्या व फायटर घेऊन प्रमोद कचरे व साक्षीदार विशाल बापू सपकाळ यांच्या नाका-तोंडावर फाइटरने मारले. तसेच इतर तीन इसमांनी लाकडी काठ्यांनी प्रमोद कचरे व साक्षीदार यांना शिवीगाळ करून मारहाण केली. दगडू पांचाळ याच्यासह सात ते आठ इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रमोद कचरे व साक्षीदार यांना दुखापत केली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात राजू पांचाळ व दगडू पांचाळ यांच्यासह सात ते आठ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोना योगेश महाजन हे करीत आहेत.