जामनेर (प्रतिनिधी) झोपाळ्याच्या झोळीतून बाळ पडू नये, यासाठी मध्यभागी संरक्षणासाठी बांधलेला रुमालच बाळाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची दुर्दैवी घटना जामनेरात घडली आहे. निर्भय इंगळे (वय १) असे मृत बालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच आई-वडिलानी मोठ्या आनंदात मुलाचा वाढदिवस साजरा केला होता.
जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत वसंत इंगळे हे पत्नी व कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वसंत इंगळे हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. तर त्यांची पत्नी रुग्णालयात कामाला आहे. गुरुवारी दुपारी निर्भयचे वडील वसंत इंगळे कामानिमित्त बाहेर होते. शुक्रवारी दुपारी निर्भयच्या आईने कामावर जाण्यापूर्वी त्याला दूध पाजले आणि घरातील झोपाळ्याच्या झोळीत त्याला झोपविले. तसेच झोपाळ्यातून बाळ पडू नये म्हणून मध्यभागी रुमाल बांधला. एवढेच नव्हे तर घरात असलेल्या लहान बहिणीस बाळाकडे लक्ष देण्याचे सांगितले आणि मग घरातून बाहेर पडल्या. मात्र, अचानक जागे झालेल्या निर्भयने खाली उतरण्याचा प्रयत्न करताच संरक्षणासाठी बांधलेला रुमालच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
निर्भयच्या मावशीने जेवणापूर्वी झोळीतील बाळाकडे डोकावून पहिले निर्भयच्या मावशीने जेवणापूर्वी झोळीतील बाळाकडे डोकावून पहिले असता तो झोपेत होता. जेवण करून परतल्यानंतर पुन्हा बाळाकडे मावशी गेली असता तो झोळीबाहेर लटकलेला दिसल्याने त्यांनी त्याला बाहेर काढले, मात्र तो हालचाल करीत नसल्याने त्यांनी कुटुंबीयांना तत्काळ बोलावून घेतले. आई, वडिलांनी निर्भय यास जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
















