जामनेर (प्रतिनिधी) एका ३५ वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चंद्रकला धोंडू बावस्कर (रा. तोंडापूर), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रेमसंबंधाच्या संशयावरून आई-वडिलांनी दोन मुलांच्या मदतीने खून केल्याचे समोर आले आहे.
शमीम शाह कासम शाह याचे शेत राक्षा (ता.सोयगाव) राक्षा शिवारात आहे. शमीम शनिवारी शेतात काम करत असताना तिथे चंद्रकलाबाई धावत आली. माझे भाऊ आई-वडील मला प्रेमसंबंधांच्या कारणावरून मारून टाकणार आहेत, मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी तिने शमीमला विनवणी केली. त्याने तिला बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले. त्याच वेळी तिचे भाऊ कृष्णा व शिवाजी यांनी तिच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. यातच तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सर्वांनी शमीम यालाही मारहाण केली. शमीमने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत पळ काढत पोलीस स्थानक गाठले. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु ती हद्द फर्दापूर शिवारात असल्याने फर्दापूर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. यानंतर शमीम शाह कासम शाह याच्या फिर्यादीवरून मृत तरुणीचे दोन भाऊ, आई, वडील यांच्यावर फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फर्दापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवला. रात्री उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. याबाबतचे वृत्त आज ‘दिव्य मराठी’ने दिले आहे.