जामनेर (प्रतिनिधी) किक्रेटचा बादशाह सचिन तेंडुलकरकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्या मूळच्या जामनेरातील एसआरपीएफ जवानाने राहत्या घरात गोळी झाडत आत्महत्या केली. प्रकाश कापडे असे मयताचे नाव आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
सुरक्षा रक्षकाच्या आत्महत्येने खळबळ
प्रकाश कापडे हे गेल्या 15 वर्षांपासून एसआरपीएफमध्ये कार्यरत होते. ते सध्या मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करत होते मात्र आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगरातील घरी आले होते.
बुधवारी पहाटे त्यांनी राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून घेतली. त्यावेळी घरातील सर्व जण झोपले होते. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घरातील लोक धावत आले तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पंचनामा सुरू असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
यापूर्वी प्रकाश कापडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अंगरक्षक म्हणून काम केले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे.