भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कु-हे पानाचे येथे कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गावामध्ये स्वयंस्फूर्तीने गाव शनिवारपासून (दि.१९) तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
आज रोजी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील, माजी उपसरपंच डॉ. टी. टी. बारी, उत्तम काळे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर वराडे, सुनील बारी, राजू भगत, विलास चौधरी, गोकुळ वराडे , डॉ. संदीप टोगळे यांच्यासह काही नागरिक व मित्र मंडळ यांनी बैठक घेऊन गाव शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. बंद मधून दवाखाने, मेडिकल, पिठाच्या गिरण्या, दूध डेअरी व कृषी केंद्र यांना वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गावात टॅंकरद्वारे फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी गाव बंदच्या निर्णयामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीस सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी तथा प्रशासक उमेश पाटणकर , जिल्हा परिषद माजी सदस्य समाधान पवार, सुभाष पाटील व माजी उपसरपंच डॉ. टी.टी .बारी यांच्यासह आदी उपस्थिती होते.