नंदुरबार (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत. तशातच देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे नंदुरबारमधील कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्याचा पुढचा अंक नंदुरबारमध्ये पाहायला मिळणार का याची उत्सुकता आहे. कारण आज सत्ताधारी तिन्ही पक्षातील दिग्गज नेते आणि विरोधी भाजपतील नेते एकाच मंचावर आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री के. सी पाडवी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांचा भावी सहकारी म्हणून उल्लेख केल्याने पुन्हा नवी समीकरणे जुळून येणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली की नाही, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.















