जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी ‘जेडीसीसीची निवडणूक की फसवणूक?’ या शीर्षकाखाली एक लेख लिहिलेला असून जेडीसीसीमध्ये माणसे संचालक बनली तर प्रामाणिक असतील का ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत जिल्हा बँक निवडणुकीवर परखड भाष्य केले आहे.
शिवराम पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी
जेडीसीसीच्या संचालक मंडळाची निवडणूक लागण्याआधी जिल्ह्यातील राजकीय बदमाषांनी आपल्या बगलेतील सोसायटींना अ आणि ब दर्जा मिळवून घेतला.तो कामकाजातून नव्हे, ऑडिटर ला हातीशी धरून. आणि बाकीच्या सोसायटी हेतूपुरस्कर क,ड मधे ठेवल्या. येथून कटकारस्थान सुरू केले तर ही माणसे संचालक बनून खरोखरच प्रामाणिक असतील का?शक्यच नाही.
विकास मतदार संघातून उमेदवारी करणाऱ्यांनी आपल्या बगलेतील सदस्यांची नावे मतदान साठी प्रस्ताव बनवून घेतले.तो ठराव सुद्धा पैसे देऊन. त्याला जवळपास दोन लाखाची वाटप केली.येथूनच सदस्य ,व्यवस्थापक विकत घेण्याची प्रक्रिया सुरू केली.आता ही माणसे जेडीसीसी मधे संचालक बनली तर प्रामाणिक असतील का?शक्यच नाही.
तालुका निहाय विकास सोसायटी चे पन्नास ते शंभर मतदार आहेत.यापैकी साठ टक्के मतदार प्रत्येकी दोन ते पांच लाखात खरेदी केले जाणार आहेत.कोटी कोटी यासाठी जुन्या संचालकांनी तयार ठेवले आहेत. पैसे टाकून पाकिटे तयार आहेत.फक्त निवडणूक आधी रात्री वाटप करणार आहेत.ते पाकिट देतांना माय बहिण ज्वारी ची शपथ घेणार आहेत.बोल,माझ्या मायची शपथ ,मी तुम्हाला मतदान करीन.माय जिवंत नसेल तर बहिणीची शपथ घेतील. बहिण नसेल तर ज्वारी ची शपथ घेतील.अशी माय बहिण ची अब्रू खुंटीला टांगणारी माणसे जेडीसीसी संचालक बनली तर प्रामाणिक असतील का?शक्यच नाही.
अशा अवैधरित्या, गैरमार्गाने संचालक बनलेली माणसे नंतर चेयरमन बनण्यासाठी खेचाताण करतील. जसे बैल मेल्यावर कुत्रे करतात तसे.तू फर्रे मी मुंडके.रोखीचा व्यवहार सुद्धा करतील. असे कोटी कोटीचा खर्च करून संचालक, चेयरमन बनलेली माणसे खरोखरच प्रामाणिक असतील का?शक्यच नाही.
जेडीसीसी ची संचालक मंडळी हिच मुळात लुटारूंची टोळी असते.जो बनला तो स्वतासाठी,बायकोसाठी,मुलासाठी, मुलगीसाठी,सुनेसाठी ,मुलासाठी खूप मोठे कोटीच्या आकड्यात कर्ज उचलतो.कोणी पुण्याला जमीन घेतो.कोणी पाळधी ते तरसोद नवीन हायवे ची जमीन घेतो.कोणी आख्खा साखर कारखाना विकत घेतो.कोणी विधानसभा निवडणुकीत खर्च करतो.हिच ती माणसे आज मोठमोठ्या डगल्यात आणि सफारीत दिसत आहेत. मुलांनी विचारले कि ,पप्पा ठक कसे दिसतात ? तर यांचे फोटो दाखवा.किंवा फुरसत असेल तर जेडीसीसी त आणून दाखवा.
आम्ही शेतकरी, आम्ही कामकरी,आम्ही व्यापारी एरवी खूप बोटे मोडतो,तोंड वेंगाळतो, शिव्या हासडतो .पण निवडणूक काळात नाडी ढिली ठेवतो.बुद्धी गहाण ठेवतो.तर मग,त्याचा गैरफायदा ठक घेणारच!आणि मग मतदार पांच वर्ष फक्त तक्रार, आंदोलन, मोर्चा काढणार?जसे जळगाव चे गाळेधारक काढतात तसे.” पाठीवर मारा,पोटावर नका मारू” एकदाचा तुम्ही ठक निवडून दिला तर तो त्याला आवडेल तेथे मारील.जेथे नरम लागेल तेथे मारेल.जेथे अंधाबहिरा मिळेल तेथे मारील.जेथे कोकलणार नाही तेथे मारील.
(हा लेख फक्त मत विकणाऱ्या निर्बुद्ध लोकांसाठी आहे.चुकून कोणी सुबुद्ध माणसाने वाचला तर निर्बुद्ध माणसाला पाठवा.)
….शिवराम पाटील.
9270963122
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.