धरणगाव (प्रतिनिधी) बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि चार हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी धरणगाव बस स्थानकात घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, भारती जालिंदर पाटील (वय ४० रा. कुकावल ता.शहादा जि नंदुरबार) ह्या दि. ७ रोजी कुकावल ता. शहादा येथे जाण्यासाठी धरणगाव बस स्थानकात आल्या होत्या. यावेळी जळगाव ते अंकलेश्वर जाणाऱ्या बसमध्ये चढत असतांना दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधील २१ हजार रुपये किंमतीची ७ ग्रॅम वजनाचे मनीमंगळ सुत्र, १५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे फुल साखळी आणि ४ हजाराची रोकड असा ऐवज लंपास केला.
दरम्यान, चोपडा बस स्थानक आल्यानंतर भारती पाटील यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. यावेळी बस कंडक्टरने धरणगाव बस स्थानकात गर्दी होती, त्यावेळी दोन संशयित महिला दिसल्याचे सांगितले. त्यामुळे भारती पाटील यांनी तात्काळ धरणगाव पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. पुढील तपास पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत.