जळगाव (प्रतिनिधी) शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ४ हजार ९०० रुपयांचे दागिने व ५ हजार ४५० रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील अनिता भूषण धनगर (वय ३२) या सोमवार, ३ डिसेंबर रोजी दुपारी व्यवसायासाठी आवश्यक कटलरीचा सामान घेण्यासाठी फुले मार्केटमध्ये आल्या होत्या. मार्केटमधील गुप्ताजी नमकीन या दुकानासमोरुन कटरीचा सामान घेतल्यानंतर त्या गांधीमार्केटकडे जात असतांना अनिता धनगर या अनोळखी महिलांनी धक्का दिला. त्यानंतर आणखी एका दुकानात अनिता धनगर या कटलरीचा सामान घेण्यासाठी गेल्या. साहित्य खरेदी केल्यावर पैसे देण्यासाठी त्यांची पर्स उघडली असता, पर्समधील ४ हजार ९०० रुपये किंमतीची सोन्याची एक ग्रामची बाळी व ५ हजार ४५० रुपये असलेले पाकीट लंपास असल्याचे दिसून आले. धक्का देणार्या तीन अज्ञात महिलांनीच पर्समधून ऐवज लांबविल्याचा असल्याची तक्रार अनिता धनगर यांनी शहर पोलिसात दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहेत.