जळगाव (प्रतिनिधी) कपाटाचे कुलूप खराब झाल्यामुळे घरातील सोन्याचे दागिने एका डब्यात ठेवून तो डबा फ्रिजच्या खाली ठेवलेला होता. त्या डब्यातील २ लाख ३० हजार रुपये किंमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना जूने जळगावातील भोई वाड्यात उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जूने जळगावातील भोई वाड्यात भरत सुभाष पवार (वय २८) हा तरुण वास्तव्यास असून तो एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत नोकरीस आहे. त्यांचे घर दुमाजली असल्याने घराच्या वरच्या मजल्यावर त्याचा मोठा भाऊ राहुल पवार हा त्याच्या परिवारासह वास्तव्यास आहे. त्याच्या भावाला दारु पिण्याची सवय असल्यामुळे त्याची पत्नी विभक्त राहते. गेल्या चार वर्षापासून भरत पवार यांच्या घरातील कपाटाचे कुलूप खराब झाल्यामुळे त्यांनी घरातील सोने चांदीचे दागिने स्टिलच्या डब्यात ठेवले. त्या डब्याला लॉक लावून तो डबा फ्रिजच्या खाली ठेवला होता आणि त्याची चावी ही घरातील कपाटावर ठेवलेली होती.
चांदीचे न नेता सोन्याचे दागिने नेले चोरुन
दि. २ एप्रिल रोजी सकाळी भरत पवार हे कामावर जाण्याची तयारी करीत होते. त्यावेळी तंना कपाटावर ठेवलेला पेपर उचकलेला दिसला. त्यांनी तो पेपर बघितला असता, त्यांना तेथे चावी दिसून आली. त्यांनी सोने चांदीचे दागिने ठेवलेला डबा उघडून बघितला, परंतु त्यामध्ये केवळ चांदीचे दागिने दिसून आले तर सोन्याचे दागिने दिसून आले नाही.
चोरी झाल्याची खात्री होताच दिली पोलिसात तक्रार
डब्यात दागिने दिसून न आल्याने भरत पवार यांनी वडीलांना विचारले. मात्र त्यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर पवार यांनी त्यांची पत्नी माहेरी गेलेल्या असल्याने त्यांनी पत्नीला फोन करुन तु सोन्याचे दागिने सोबत घेवून गेली आहे का याबाबत देखील विचारणा केली. परंतु त्यांनी नाही सांगितल्याने पवार यांना घरातून २ लाख ३० हजार रुपये किंमतीचे तीन तोळे दागिने चोरी गेल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच शनिपेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहे.