वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात होत असून आज, बुधवारी अमेरिकेचे ४६वे राष्ट्रअध्यक्ष म्हणून जो बायडेन, तर उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या हॅरिस या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे.
बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार उपराष्ट्रपती कमला हॅरीस रात्री १० वाजता शपथ घेतील त्यानंतर रात्री १०.३० वाजता राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा शपथविधी पार पडेल. या शपथविधी सोहळ्यात गायिका-नृत्यांगना लेडी गागा राष्ट्रगीत गाणार आहे. तर, अमांडा गोरमॅन या शपथविधी सोहळ्यासाठी लिहीलेली एक खास कविता वाचून दाखवतील. अभिनेत्री जेनिफर लॉपेझ गाणं सादर करणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक वयाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणारे बायडन शपथ घेतल्यानंतर लगेचचं राष्ट्राला राष्ट्रपती म्हणून आपलं पहिलं संबोधन करतील. ऐतिहासिक भाषण भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक विनय रेड्डी तयार करत आहेत. जे एकता आणि सौहार्दावर आधारित असणार आहे. ५९ व्या अध्यक्षीय शपथविधीची जोरदार तयारी सुरू असून ‘अमेरिका युनायटेड’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. हा मुद्दा घेऊन बायडेन आणि हॅरिस यांनी सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. एरव्ही हा कार्यक्रमाकडे जगाचे लक्ष लागलेले असते. यंदा मात्र कोरोना विषाणूच्या साथीचे आणि अलीकडेच कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसाचाराचे त्यावर सावट आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी नेहमीसारखी प्रचंड गर्दी नसेल. केवळ एक हजार जणांनाच या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तर, जवळपास २५ हजाराहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत.















