मॉस्को (वृत्तसंस्था) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वीडन आणि फिनलँडला उघड धमकी दिली आहे. स्वीडन आणि फिनलँड नाटोमध्ये सहभागी झाल्यास त्यांची अवस्थादेखील युक्रेनसारखी होईल, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.
नाटोमध्ये सामील होऊ नका. अन्यथा परिणाम गंभीर होतील, असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किवमध्ये शिरलं असताना रशियाकडून स्वीडन आणि फिनलँडला धमकी देण्यात आली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना पदावरून दूर करण्यासाठी रशियानं आणखी आक्रमक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. रशियाचे पॅराटूपर्स किवमध्ये दाखल झाले आहेत.
झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पुतीन लवकरच त्यांचं शिष्टमंडळ पाठवू शकतात, असं वृत्त आहे. क्रेमलिमने प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक रशियन शिष्टमंडळ युक्रेनसोबत संवाद साधण्यासाठी मिन्स्कला पाठवलं जाऊ शकतं. युक्रेननं शरणागती पत्करल्यास चर्चेस तयार असल्याची भूमिका रशियानं घेतली. मात्र युक्रेननं गुडघे टेकण्यास स्पष्ट नकार दिला.
देशातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून रशियन सैन्याचा मुकाबला करावा असं आवाहन युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलं आहे. देशाच्या अनेक शहरांवर हल्ले होत आहेत. शेरनिहिव, सुमी, खारकीव, डोनवाससह अनेक शहरांवर हल्ले सुरू आहेत. पण आपली राजधानी कीव गमावू शकत नाही, असं म्हणत झेलेन्स्की यांनी देशवासीयांना शत्रुशी दोन हात करण्याचं आवाहन केलं.