वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) एक आत्महत्येची घटना अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत (Suicides in America) घडली होती. पण ही घटना इतर घटनांपेक्षा खूपच वेगळी होती. त्यामुळे ती कायम चर्चेत असते. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे एका महिलेने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि तिने इमारतीवरून उडी मारली. ८६ व्या मजल्यावरून खाली उडी मारूनदेखील ती वाचली. ‘देव तारी, त्याला कोण मारी’ याचा साक्षात्कारच या घटनेतून होतो.
एल्विता अॅडम्स असं त्या महिलेचं नाव होतं. आत्महत्येचा प्रयत्न केला, तेव्हा ती महिला २९ वर्षांची होती. एल्विता न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला होती. नोकरी गमावल्याने तिच्यावर आर्थिक संकट ओढवलं होतं. घरभाडं देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. घरभाडं भरलं नाही, तर घरातून हाकलून लावण्याची धमकी घरमालकाने दिली होती. यामुळे ती अस्वस्थ झाली होती. अखेर परिस्थितीसमोर हतबल होऊन तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, २ डिसेंबर १९७९ रोजीची ही गोष्ट आहे. एल्विताने न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’ वरून उडी मारण्याचा निर्णय घेतला. ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’वरून उडी घेऊन अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. २ डिसेंबरला एल्विताने ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’च्या ८६ व्या मजल्यावरून खाली उडी मारली. उडी घेताच ती २० फूट खाली गेली खरी; पण बाहेर हवेचा जोर एवढा होता, की ती पुन्हा ८५ व्या मजल्यावर फेकली गेली. यामुळे तिचा जीव वाचला. पण तिला दुखापत झाली. मात्र तिचा आत्महत्येचा प्लॉन पुरता फसला.
इमारतीच्या ८६ व्या मजल्यावरून उडी घेतल्यानंतर आता आपलं जीवन संपलं, असाच विचार तिच्या डोक्यात असेल. पण जे प्रत्यक्षात झालं, त्याचा विचार कोणीच केला नसेल. तिची आत्महत्येची घटना फारच चर्चेत राहिली होती. तो दिवस कायमचा इतिहासात नोंदला गेला. आजही या घटनेवर चर्चा होताना दिसून येते.