काबूल (वृत्तसंस्था) काबूलमध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तालिबानचा टॉप कमांडर मौलवी हमदुल्ला मुखलिसही मारला गेल्याचं समजतंय. हमदुल्ला मुखलिस हा तालिबानच्या विशेष दल बद्री ब्रिगेडचा कमांडरही होता. या ब्रिगेडला काबूलमधील सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती.
अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मंगळवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोट आणि गोळीबारात २५ जण ठार झाले आहेत. काबूलमधील सर्वात मोठ्या लष्करी रुग्णालयात बंदूकधाऱ्यांच्या एका गटानं हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार केला, असं सांगण्यात येतंय. हल्लेखोर नंतर तालिबानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत ठार झाले.
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सांगितलं, की ४०० खाटांच्या सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा स्फोट झाला. यानंतर इस्लामिक स्टेटच्या बंदुकधारी गटानं हल्ला केला. ज्यात सर्वजण १५ मिनिटांत मारले गेले. त्यानंतर तालिबानच्या स्पेशल फोर्स कमांडो टीमला हेलिकॉप्टरन हॉस्पिटलच्या आवारात सोडण्यात आलं. यामुळे हल्लेखोरांना रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखलं गेलं आणि सर्वांना गेटवर गोळ्या घालून ठार मारलं, असं त्यांनी सांगितलं.
तालिबानच्या एका सुरक्षा अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, की या हल्ल्यात २५ लोक ठार झाले असून ५० हून अधिक जखमी झाले आहेत. परंतु, अधिकृत जीवितहानी झाल्याची पुष्टी झालेली नाही. काबुल मिलिटरी कॉर्प्सचे प्रमुख मौलवी हमदुल्ला मुखलिस हे मृतांमध्ये सामील असल्याचंही तालिबानच्या अधिकाऱ्यानं सांगितलंय.