मुंबई प्रतिनिधी । कंगना राणौत यांच्या बंगल्यावरील कारवाईप्रकरणी प्रतिवादी म्हणून नावे घेतलेले मुंबई महानगरपालिका (एमएमसी) चे अधिकारी भाग्यवंत लट्टे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जबाब नोंदविण्यास वेळ मागितला आहे. ही परवानगी देताना कोर्टाने मुंबई महानगरपालिकेला कठोर निर्णय दिला आहे. या खटल्याची सुनावणी उद्या होणार आहे.
मुंबई महापालिकेनं आपल्या बंगल्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर आहे आणि त्यासाठी आपल्याला नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी करत कंगनानं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळं माझ्या बंगल्यावर कारवाई केली गेली असं म्हणत तिनं राऊतांना या प्रकरणात ओढलं आहे. तसंच, तोडकामाची कारवाई करणारे सहाय्यक आयुक्त लाटे यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून न्यायालयानं स्पष्टीकरण मागवलं होतं. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढं आज या प्रकरणाची पुढील कार्यवाही झाली. ‘संजय राऊत हे संसद अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. त्यामुळे हायकोर्टाने त्यांना नंतर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुभा दिली. मात्र, बंगला अंशतः तोडलेल्या अवस्थेत असल्याने आणि पावसाळा सुरू असल्याने सुनावणी अधिक लांबवू शकत नाही, असे बजावत हायकोर्टाने उद्या याचिकादारांच्या वकिलांना युक्तिवाद सुरू करण्यास परवानगी दिली.