जळगाव (प्रतिनिधी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या भिंतीचे सुशोभिकरण करणारे प्राचार्य डॉ.अविनाश काटे व त्यांच्या पत्नी आणि मुलीच्या कलाकृतीची दखल दिल्लीतही घेण्यात आली. त्यामुळे काटे दांपत्य आता दिल्लीतील सैनिकांच्या रुग्णालयाच्या भिंती व आतील काही भागाची रंगरंगोटी करुन त्या रुग्णालयाच्या सुशोभिकरणातही भर घालणार आहेत.
जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या भिंतीवर वॉलपेटींगचे काम शहरातील निवासी व ओडीसामधील एबीएसकेपीेम या फाइन आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश काटे, त्यांच्या पत्नी प्रा.वैशाली काटे यांनी मोफत केले. त्यांना त्यांची दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी अविवा व रुग्णालयातील काही कर्मचार्यांनी देखील सहकार्य केले. प्रा.वैशाली काटे या गरोदर असताना देखील त्यांनी वॉलपेटींगच्या कामात सक्रिय सहभाग घेतला होता, हे विशेष. जीएमसीतील वॉलपेटींगच्या कलाकुसरीमुळे भींतीसह परिसरातील सौंदय खुलून रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलला आहे. या सुशोभिकरणामुळे रुग्णालयातील अधिकारी, कर्मचार्यांसह रुग्णांना सुद्धा प्रसन्नमय वाटते. या सुशोभिकरण व परिसरातील स्वच्छतेच्या कामाची दखल जागतिक पातळीवरील दिल्लीतील फेस इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन ट्रस्टने घेतली. या ट्रस्टतर्फे उल्लेखनीय कामानिमित्त जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला ‘फेस इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’ हे प्रमाणपत्र देण्यात आले. ट्रस्टतर्फे या प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांना नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी सर्व कलाकारांचाही गौरव करण्यात आला.
युद्धभूमीवरही करणार सजावट
जळगावातील रुग्णालयाच्या भिंतीवरील लक्ष वेधून घेणारी आकर्षक वॉलपेटींगबाबत दिल्लीतील सैनिकांच्या रुग्णालय प्रशासनास कळाले. या प्रशासनाने काटे दांपत्याशी संपर्क साधला. प्रशासनाने त्यांच्याही दिल्लीतील रुग्णालयात सुशोभिकरणाच्या कामाची जवाबदारी प्राचार्य काटे यांच्याकडे दिली आहे. त्यानुसार या कामाला लवकरच सुरुवात होत आहे. तसेच कारगिल विजय दिनानिमित्त कारगिलच्या युद्धभूमीवरही सुशोभिकरणाचे काम प्राचार्य काटे यांच्यावर सोपविण्यात आले आहे.
मुंबईतही कलाकृतीचा मानस
प्राचार्य डॉ.अविनाश काटे हे या अगोदर जळगावातील मूलजी जेठा महाविद्यालयातील ओजस्विनी कला विभागात प्राचार्य होते. त्यांनी महापालिकेच्या मालमत्तेच्या वास्तुवरील एकूण २० हजार स्वेअर फूट भींतीवर, पोलीस वसाहतीमधील आणि जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थान भागातील स्विमिंग पूल व परिसरात रंगरंगोटी केली आहे. गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणावरील रिकाम्या भिंती दिसल्या की, त्यावर काही तरी कलाकृती करुन तेथील सौंदर्यात भर घालावी, अशी इच्छा प्राचार्य डॉ.काटे यांची असते. मुंबईतील आझाद मैदानाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कलाकृती साकारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.