नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय मतभेदानंतर, अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. आज सायंकाळी चार वाजता ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत.
पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य करू याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. आपण समाधानी असून पक्षाची शिस्त मोडणार नाही, असेही बी. एस. येडियुरप्पा म्हणाले होते.
बी. एस. येडियुरप्पा आज दुपारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. येडियुरप्पा यांनी भाजपा सरकारच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. आज सायंकाळी चार वाजता कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना आपण राजीनामापत्र देणार असल्याचे येडियुरप्पा म्हणाले.
भारतीय जनता पक्षानं २०१९ साली ७५ वर्षांच्या आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्याचं धोरण सोडलं आणि बी. एस. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी बसवलं होतं. त्यापूर्वी २००८ साली येडियुरप्पा जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते दक्षिण भारतातले भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री होते. तीन वर्षांतच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या व्होट बँकेचं मोठं नुकसान केलं. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मोदींनी त्यांना परत पक्षात आणलं होतं.