बंगळुरू (वृत्तसंस्था) काँग्रेसने कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली असून एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. काँग्रेस तब्बल १३१ जागांवर आघाडीवर आहे. एकंदरीत कॉंग्रेसला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिल्याचे चित्र आहे.
राज्यात बहुमतासाठी 113 संख्याबळ आवश्यक आहे. त्याच्याही पेक्षा काँग्रेसने अधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल, अशी परिस्थिती आहे. काँग्रेसला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे इतर पक्षांना केवळ 7 जागा मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पराभवाची जबादारी स्वीकारली असून २०२४ मध्ये लोकसभेला आम्ही पुन्हा बाजी मारू अशा विश्वास बोलून दाखवला आहे.
काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले की, आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हैदराबादमध्ये एक रिसॉर्ट बुक केलं आहे, कारण भाजप फोडाफोडीचे राजकारण करू शकते. ते म्हणाले की, भाजपच्या एका नेत्यानेही प्लॅन बी सुरू असल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप आमदारांची फोडाफोडी करू शकते.
कर्नाटकात भाजपकडून ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस सतर्क झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी ऑपरेशन हस्था सुरू केलं आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी हे ऑपरेशन हस्था आहे. या ऑपरेशन हस्थामध्ये काँग्रेस नेते डीके शिवकुमार, बीके हरिप्रसाद आणि खुद्द मल्लिकार्जुन खरगे आहेत. दरम्यान, 2018च्या निवडणुकीत 104 जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. यावेळी भाजपला केवळ 68 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे भाजपला जवळपास 30 जागांचं नुकसान होताना दिसत आहे.