पुणे (वृत्तसंस्था) शिवसेना हा पक्ष अजून फुटलेला नाही. विधानसभेत ही सगळी प्रक्रिया व्हायला हवी होती, शिंदेंनी सगळा निर्णय हा विधानसभेच्या बाहेर केला आहे. त्यामुळे कायदेशीररित्या एकनाथ शिंदेंचा व्हीप हा चुकीचा ठरू शकतो, असे मत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
सरोदे पुढे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी नि:पक्ष वागले पाहिजे. त्यांनी कुठलीही पक्षीय भूमिका घेणे चुकीचे आहे. पण काल त्यांनी जो निर्णय घेतला तो पक्षीय असल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यांनी याबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अर्धवट निकाल दिल्यामुळे विधानसभेच्या व्हीपचा हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि घटनेनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली असल्यानेच एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून परवानगी मिळाली आहे, असे मत कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.राज्यघटनेनुसार एखादा पक्ष ज्यावेळेस फुटतो तो पक्ष अगदी केंद्रीय पातळी पासून ग्रामपंचायतच्या पातळीपर्यंत फूट दिसली पाहिजे. पण सध्या तरी शिवसेनेचे दोन पक्ष झालेले दिसत नाहीत, असेही सरोदे यांनी म्हटले आहे.