धरणगाव (प्रतिनिधी) योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. पण बऱ्याचदा राजकीय मतभेदांमुळे रूग्णांपर्यंत मदत पोहचत नाही. परंतू पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राजकीय मतभेद बाजू ठेवत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला २ लाखांची मदत मिळवून दिली आहे. या मदतीमुळे औरंगाबाद येथे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
धरणगाव शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भूपेंद्र पाटील यांच्या धर्मपत्नी प्रगती पाटील ह्या मागील काही वर्षापासून मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्या मुत्रपिंडाच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल ८ लाख रुपये खर्च येणार होता. ८ डिसेंबर रोजी शस्त्रक्रिया होणार होती. काही रक्कम भूपेंद्र पाटील जमवली होती. परंतू तरी मोठ्या रकमेच्या मदतीची त्यांना गरज होती. त्यामुळे त्यांनी लागलीच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण हकीगत सांगितली. ना.पाटील यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांची मदत फक्त दोन दिवसात मिळवून दिली.
यामुळे प्रगती पाटील यांचे औरंगाबाद येथील मेडीकव्हर हॉस्पीटलमध्ये डॉ.सचिन सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुत्रपिंडाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. भारवलेल्या भूपेंद्र पाटील यांच्या परिवाराने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे. दरम्यान, मंत्रालयात भूपेंद्र पाटील यांच्या पत्नींच्या वैद्यकीय मदतीची फाईल फिरवण्यासाठी पालिकेतील गटनेते पप्पू भावे, वाल्मिक पाटील आणि विलास महाजन यांनी मदत करत त्यांना धीर दिला.
दिवसभरातील चोवीस तास राजकारणाचा ध्यास, हीच आजकाल आदर्श राजकारणाची पद्धत झाली आहे. वर्षातील ३६५ दिवस, दिवसाचे २४ तास आणि तासाच्या प्रत्येक मिनिटाला फक्त राजकारण करावे, असे मानणाऱ्या राजकारण्यांचा वर्ग वाढत आहे. या राजकारणामुळे समाजामध्ये दुही देखील माजत आहे. परंतू अशा कठीण काळातही धरणगावातील या घटनेने राजकारणात अजूनही मानवी संवेदनाच महत्वाची असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.