धरणगाव (प्रतिनिधी) पाळधी येथे गो-हत्या झाली होती. परंतू ना.गुलाबराव पाटील, भाजपा नेते एकनाथराव खडसे, गिरीश महाजन यांनी त्याबाबत चुप्पी साधल्याचा आरोप करत एका तरुणाने तिघांना धमकी दिल्याचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध सुरु केला असून वेगवेगळ्या व्हाटस्अप ग्रुपवर संबंधित तरुणाचा फोटो टाकून ओळख पटल्यास धरणगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज सकाळपासून एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण ना. गुलाबराव पाटील, भाजपा नेते एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांना उद्देशून पाळधी येथे गोहत्या झाली होती. तसेच काही गायींना आम्ही सुरक्षित गो-शाळेत रवाना केले होते. परंतू या प्रकरणात तिघांपैकी कोणत्याही नेत्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप या तरुणाने केला. तसेच हे तीन नेते ज्यादिवशी समोर येतील किंवा भाषण करतील तर यांना स्टेजवरून खाली फेकून देईन अशी धमकी दिली आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात काही आक्षेपार्ह शब्द देखील या तिघं नेत्यांबद्दल वापरण्यात आले आहेत. तसेच २०१२ मध्ये देखील असाच प्रकार झाला होता. परंतू तेव्हादेखील कुणीच लक्ष दिले नसल्याचे या तरुणाने म्हटले आहे. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी संबंधित तरुणाचा युद्धपातळीवर शोध सुरु केला आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या व्हाटसअप ग्रुपवर संबंधित तरुणाचा फोटो टाकून ओळख पटल्यास धरणगाव पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
















